नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार बाहेर पडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर दोन्ही गटाने आपण मूळ राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचे दावे सुरू केले आहेत. तर विदर्भाच्या दौऱ्यावर आल्यानंतर राष्ट्रवादी विदर्भात का वाढत नाही, याबाबत दोन्ही गट एकमेकांकडे बोट दाखवत असल्याचे चित्र आहे.

प्रफुल पटेल यांनी या मुद्याला सर्वप्रथम हात घातला. त्याला अनिल देशमुख यांनी उत्तर दिले. आता सुप्रिया सुळे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. तर कृषी मंत्री धनंजय मुंडेदेखील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करीत आहेत. त्यामुळे पुन्हा राष्ट्रवादी विदर्भात न वाढण्यास जबाबदार कोण असा प्रश्न विचारला जाऊ लागला.

हेही वाचा – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे म्हणाले, “आता वेळ आली आहे भारताचा खरा इतिहास सांगायची”

हेही वाचा – महिन्याच्या सुरुवातीलाच व्यावसायिक सिलिंडरचे दर वाढले, नागपूरमध्ये कितीला मिळणार?

याबाबत धनंजय मुंडे म्हणाले, गेल्या दहा वर्षांपासून ताईसुद्धा (सुप्रिया सुळे) राजकारणात आहेत. आता दोष कुणाला द्यायचा. पक्षाचे नेतृत्व त्यांच्याकडे होते. भूमिका त्यांच्याकडे होत्या. विदर्भात सुरवातीपासून १९९९ ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निर्माण झाला, पण वाटते तेवढी ताकद निर्माण झाली नाही, हे मान्य करावे लागेल. मी आज मंत्री असलो तरी माझ्यातला कार्यकर्ता मरू देत नाही. पक्ष संघटनेबाबत मंथन होणे आवश्यक आहे, असा सल्ला सुळे यांना मुंडे यांनी दिला.