नागपूर – नागपूर हे शहर सध्या महाराष्ट्राची उपराजधानी असली तरी पूर्वी ते मध्यप्रांताच्या राजधानीचे शहर होते. त्याच काळात येथे सुरू झालेले बसस्थानक आता आंतरराज्यीय बसस्थानक म्हणून ओळखले जाते. येथून मध्यप्रदेश परिवहन विभागाच्या बसेस सुटतात. सध्या या बसस्थानकाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
टेकडी उड्डाण पुलाचे पाडकाम सुरू असल्याने या मार्गावर असलेल्या मध्यप्रदेश बसस्थानकावर जाण्यास अडचणी येत आहेत, त्यामुळे काही कालावधीसाठी हे बसस्थानक इतरत्र हलवण्यात यावे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
मानस चौक ते रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील टेकडी उड्डाण पुलाचे पाडकाम सध्या सुरू आहे. त्यामुळे मध्यप्रदेश बसस्थानकावर जाताना प्रवाशांना अडचणी येत आहेत. या बसस्थानकावरून दररोज अनेक बसेस मध्यप्रदेशमध्ये जाण्यासाठी सुटतात. हजारो प्रवाशांचे रोज येथून अवागमन होते. मात्र सध्याच्या स्थितीत त्यांची अडचण होत आहे.
हेही वाचा – वर्धा: टोमॅटोची उधारी मागितली म्हणून चाकूने भोसकले
पुलाच्या तोडकामामुळे रस्ता अरुंद झाला असून मलबाही रस्त्यालगत टाकला जात आहे. दरम्यान रेल्वे स्थानकापासून ऑटोरिक्षाच्या रांगा मध्यप्रदेश बसस्थानकापर्यंत येऊ लागल्या असून प्रवाशी घेण्यासाठी ऑटोचालकांची दिवसभर येथे धावपळ सुरू असते. याचाही फटका प्रवाशांना बसत आहे. त्यामुळे हे स्थानक इतरत्र हलवा अशी मागणी होत आहे.