वर्धा : वारकरी भक्तांसाठी ‘आषाढी एकादशी’ विशेष गाडी का नाही, असा सवाल खासदार रामदास तडस यांनी रेल्वे प्रशासनाला केला आहे.
देशात विविध यात्रा तसेच तीर्थस्थळाच्या उत्सवास रेल्वे प्रशासन विशेष गाड्या सोडत असते. महाराष्ट्रातही आषाढी एकादशीला हजारो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. विदर्भातून त्यासाठी रेल्वेचा पर्याय आहे. मात्र पंढरपूरला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांची संख्या तुलनेने कमी आहे. त्यामुळे वारकरी भक्तांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ते टाळण्यासाठी नागपूर ते पंढरपूर अशी विशेष रेल्वे गाडी सोडणे आवश्यक असल्याची भूमीका रामदास तडस यांनी मांडली आहे.
हेही वाचा – चंद्रपूर : ४५ गरोदर माता ‘एचआयव्ही’ बाधित, दोन वर्षांत आढळले ३४७ नवे रुग्ण
मध्यरेल्वेच्या विभागीय प्रबंधकांना एक पत्र पाठवून त्यांनी नागपूर – पंढरपूर विशेष गाडी सोडण्याची मागणी करत नागपूर – वर्धा – अमरावतीदरम्यान येणाऱ्या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्याची विनंती दिली. ही सेवा सुरू झाल्यास विठूमाईचे भक्त प्रसन्न होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच ही विशेष रेल्वेसेवा निश्चितच सुरू होईल, असा विश्वास तडस यांनी व्यक्त केला.