वर्धा : शरद पवारांच्या वर्धेत स्वारस्य दाखवण्यामागे कुस्तीगिर परिषदेतील राजकारण कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. वर्धेत भाजपचे रामदास तडस विरूद्ध राष्ट्रवादीचे अमर काळे असा थेट सामना रंगण्याची चिन्हे आहेत. वर्धेतील सभेत देवेंद्र फडणवीस यांनी पवारांनी या जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार केल्याचा टोला लगावतांनाच तडस यांनी कुस्तीगिर परिषदेत पवारांना धोबीपछाड दिल्याचे आवर्जून नमूद केले होते. यामागे कुस्तीगिर परिषदेचे राजकारण आठविल्या जाते. वर्षभरापूर्वी राज्य कुस्तीगिर परिषदेत गटाचे राजकारण गाजले होते. संघटनेचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वेळ देवू शकत नसल्याचे कारण देत त्यांचे विश्वासू बाळासाहेब लांडगे यांच्याकडे जबाबदारी सोपवली. ते निष्क्रिय असल्याचा आरोप करीत रामदास तडस यांनी संघटना बरखास्त करण्याचा डाव यशस्वी केला. राष्ट्रीय अध्यक्ष ब्रिजभूषण यांचे सहकार्य लाभल्याने तडस संघटनेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. हाच तो धोबीपछाडचा डाव म्हटल्या जातो.
हेही वाचा : सुधीर मुनगंटीवार-किशोर जोरगेवार यांचे मनोमिलन; लोकसभा निवडणुकीत प्रचार करणार
उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडून त्यांनी कुस्तीगिर व पंचांचे मानधन वाढवून घेत संघटनेवरील ताबा घट्ट केला. पवार गटाचे उरलेसुरले वर्चस्व संपुष्टात आले. वर्धेची जागा काँग्रेसला सोडण्याची विनंती धुडकावून लावत पवारांनी जागा राखली व अमर काळेची उमेदवारीही पक्की केली. पडद्यामागच्या राजकारणात काळेंचे मामा असलेले माजी मंत्री अनिल देशमुख यांनी मोलाची भूमिका पार पाडल्याची चर्चा आहे. स्थानिक नेत्यांनी अर्ज भरण्याच्या रॅलीस उपस्थित राहण्याची केलेली विनंती पवारांनी तात्काळ मान्य केली. या रॅलीतील त्यांचा सक्रिय सहभाग वर्धेतील जागेविषयी त्यांचे स्वारस्य दाखवून गेला. त्यामुळेच पवारांचे यावेळी वर्धा लोकसभा मतदारसंघावर दिसून आलेल्या विशेष प्रेमामागे संघटनेतील ‘कुस्ती’ आठवून दिल्या जाते.
हेही वाचा : योगी आदित्यनाथ यांच्याकडून अयोध्या दर्शनाचे आमिष! दर्शनाला येणाऱ्यांची सर्व व्यवस्था करण्याचा दावा
यापूर्वी पवार विरूद्ध तडस असा सामना १९९४ मध्ये झाला होता. त्यावेळचे विधान परिषदेच्या निवडणूकीत पवार समर्थीत अरविंद सावकार पोरेड्डीवार यांच्या विरोधात ज्येष्ठ नेते नरेश पुगलीया यांच्या आशिर्वादाने अपक्ष असलेले तडस विजयी झाले हाेते. पुढे दत्ता मेघेंचे बोट पकडून ते राष्ट्रवादीत आले आणि पवारांच्या समर्थनावर २००० मध्ये परत याच जागेवर निवडून आले. मेघेंनी राष्ट्रवादी सोडल्यावर पक्षातच राहलेल्या तडस यांना एस.टी.महामंडळाचे संचालकपद पवारांनी निष्ठेचे बक्षीस म्हणून बहाल केले. मात्र काही वर्षानंतर तडस पवारांना सोडून भाजपमध्ये गेले. सत्ताधारी भाजप नेत्यांच्या मदतीने त्यांनी पवारांचे कुस्तीगिर परिषदेवरील साम्राज्य संपुष्टात आणले. त्यावेळी त्यांनी केलेले पवारविरोधी वक्तव्य पवार निश्चितच विसरले नसणार, अशी टिपणी एका ज्येष्ठ पवार समर्थक नेत्याने केली. वर्धेत आल्यावर पवारांनी प्रा. सुरेश देशमुख यांच्याकडे भरपूर वेळ देत सर्व गटातटाच्या नेत्यांना बोलावून काळेंची उमेदवारी गांभीर्याने घ्या, असा दम भरल्याचे काँग्रेसच्या नेत्याने नमूद केले. पवारांनी अमर काळे यांना रिंगणात उतरवून तडसांना एक सक्षम पर्याय दिल्याचा सार्वत्रिक सूर आहे.