लोकसत्ता टीम
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सध्या पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरू आहे. चंद्रपूर येथे बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली. त्यानंतर कन्हान येथे विदर्भातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील दुसरी सभा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेचे जनतेत प्रचंड आकर्षण आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागून होते.
“भाजपा सरकार पुन्हा सत्तेत आले तर काही लोकांना पाकिस्तानला पाठवले जाईल,” असा प्रचार सुरू आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर नितीन गडकरी स्पष्टच बोलले.
आणखी वाचा-रणसंग्राम लोकसभेचा : उत्तर नागपुरात जोरदार मोर्चेबांधणी; काँग्रेसचे प्राबल्य, भाजपही सज्ज!
देशात गेल्या साठ वर्षात जे काम काँग्रेसने केले नाही ते दहा वर्षात आमच्या सरकारने करून दाखवले. या लोकसभा निवडणुकीत भाजपाला जर ४०० च्या वर जागा मिळाल्या तर ते संविधान बदलतील, असा भ्रम काँग्रेसकडून जनतेमध्ये पसरवला जात आहे. संविधान आमच्यासाठी पवित्र आहे. उलट काँग्रेसने आतापर्यंत ८० वेळा या देशाचे संविधान बदलले आहे. भाजपाचे सरकार आले तर काही लोकांना पाकिस्तानात पाठवले जाईल, हा भ्रम जनतेत पसरवला जात आहे. आमचे सरकार असे काहीही करणार नाही. जात-धर्म आणि पंथाच्या नावावर आम्ही कधीही राजकारण केले नाही, असे नितीन गडकरी म्हणाले.