नागपूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) सर्वाधिक अपघातांचे प्रमाण हे शिवशाही बसेसचे आहे. या बसेस वाईट अवस्थेत असतानाही महामंडळाकडून वातानुकुलितच्या नावाने सर्वाधिक प्रवासी भाडे आकारले जाते. गोंदिया जिल्ह्यात शिवशाही बसला झालेल्या अपघातामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) या बसच्या वाईट अवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. राज्यात एसटी महांडळाच्या ताफ्यात साध्या, निमआराम, स्लिपर कोच, शिवशाही, ईलेक्ट्रिकसह सर्वप्रकारच्या सुमारे १५ हजार ६०० च्या जवळपास बसेस आहेत. त्यात ८९२ शिवशाही बसेसचा समावेश आहे.
एसटी महामंडळाच्या बसेसच्या अपघातांचे प्रमाण ०.१७ टक्के आहे. म्हणजे, सहा लाख किलोमीटरमागे एक अपघाताची नोंद आहे. यात शिवशाही बसच्या अपघातांचे प्रमाण ०.२९ टक्के आहे. म्हणजे प्रत्येक ३ लाख ५० हजार किलोमीटरमागे १ अपघात नोंदवला जात आहे. त्यामुळे शिवशाही बसने प्रवास करणाऱ्यांचा जीव धोक्यात असल्याचा आरोप एसटीतील कामगार संघटनेकडून केला जात आहे. या विषयावर एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांची प्रतिक्रिया मिळवण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.
हेही वाचा : गोंदिया : वडील आधीच दगावले, आता आईचाही मृत्यू; चिमुकला झाला पोरका…
कारणे काय
करोना काळात प्रवासी सेवा बंद पडल्यानंतर एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती वाईट झाली. तेव्हापासून सातत्याने महामंडळात बसच्या सुट्या भागांच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. दुसरीकडे महामंडळात गरजेच्या तुलनेत तांत्रिक कर्मचारी कमी आहेत. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. याचा शिवशाही बसेसच्या देखभाल-दुरुस्तीवरही परिणाम होत आहे.
“एसटी महामंडळाकडून बसेसचे सुटे भाग वेळेवर मिळत नाहीत. तांत्रिक विभागात अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे सेवेवरील कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत असून बसेसच्या गुणवत्तेवरही परिणाम होत आहे. त्यामुळेच भंगारस्थितीतील शिवशाही बसेस चालवण्याची वेळ चालकांवर आली असून या बसेसचे अपघात वाढत आहेत.”
श्रीरंग बरगे, राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस.
हेही वाचा : पैशांसाठी तगादा लावल्याने शीर धडावेगळे केले, हत्या प्रकरणाचे गूढ…
गोंदियात शिवशाही बसचा अपघात कसा झाला?
गोंदिया ते अर्जुनी मोरगाव मार्गावर डव्वा गावाजवळ शुक्रवारी शिवशाही बसला भीषण अपघात होऊन ११ प्रवाशांचा मृत्यू तर २८ प्रवासी जखमी झाले. हे वाहन गोंदियाच्या दिशेने जात असतांना बस (क्रमांक एम.एच.०९ ई एम १२७३)च्या चालकाने दुचाकीच्या पुढे जाण्यासाठी बसचा वेग वाढवला. या प्रयत्नात बसचे चार रस्त्याच्या किनाऱ्यावरून किंचित खाली आले. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले व बस उलटली. घटनेनंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने बचावकार्य हाती घेतले.