नागपूर : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या कार्यकारिणीच्या बैठकीचे रविवारी नागपूर येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी खासदार व महासभेचे अध्यक्ष रामदास तडस यावेळी उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणुकीवर यावेळी चर्चा करण्यात आली.
पंतप्रधान पदावर तिसऱ्यांदा विराजमान झाल्याबद्दल तेली समाजाच्या वतीने नरेंद्र माेदी यांच्या अभिनंदनाचा ठरावही यावेळी करण्यात आला. मागील काही वर्षांपासून महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेने निवडणुकांमध्ये भाजपला मदत केली आहे. असे असतानाही अचानक आता आगामी निवडणुकांमध्ये कुठलाही पक्ष असला तरी त्यांचे उमेदवार आम्ही पाडू असा इशारा दिला आहे.
हेही वाचा : “देशाची आणि राज्याची सूत्रे नागपूरमधून चालतात, मात्र…”, खासदार संजय राऊत यांचा टोला
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे महासचिव डॉ. भूषण कर्डिले यांनी सांगितले की, आजपर्यंत आलेल्या वाईट अनुभवातून प्रत्येक वेळेस तेली समाजाला जाणून बुजून डावलले जाते. गृहित धरले जात आहे. मागील लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात पोटजातींसह ११ टक्के तेली समाज असूनही फक्त आमच्या राज्य अध्यक्षांना एकमेव उमेदवारी देण्यात आली.
त्यातही मराठा-कुणबी-ओबीसी असा भेद निर्माण करून ती त्यांना पराभूत करण्यात आले. समाज संघटना कमजोर करण्याचा प्रयत केला. पण आम्ही हे होऊ देणार नाही. अशा गलिच्छ राजकारणामुळे प्रत्येक वेळी, प्रत्येक प्रस्थापित पक्ष तेली समाजाला गृहीत धरून फक्त मतदानासाठी उपयोग करून घेतो अशी भावना प्रत्येक तेली समाजाच्या बांधवांमध्ये निर्माण झाली आहे.
हेही वाचा : बुलढाणा: आक्षेपार्ह विधानाचा ‘व्हिडीओ’ सार्वत्रिक, धार्मिक भावना दुखावल्या, रामगिरी महाराजांविरुद्ध गुन्हा
या ठरावाला एकमताने मान्यता
हल्लीचे सामाजिक तथा राजकिय वातावरण पाहता समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी समाजकारणामधून राजकारणाकडे वाटचाल करणे क्रमप्राप्त असल्याने यापुढे संघटनेचे धोरण बदलणे अत्यावश्यक वाटत आहे. जे पक्ष पुढे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा, विधानपरिषद, राज्यसभा, महामंडळ आदी निवडणुकीत समाजाला १० टक्के प्रतिनिधित्व/उमेदवारी देतील त्यांनाच सहकार्य करावे असा प्रस्तावच एकमताने मंजूर करण्यात येईल.
असा आहे इशारा
यापूर्वी विधानसभेसाठी तेली समाजाचे २० ते २२ आमदार राहत होते. ज्या भागात समाजाचे मतदान मोठ्या प्रमाणात आहे तेथे सक्षम उमेदवार दिले जात होते. मात्र, आता केवळ एक ते दोन जागांवर उमेदवारी दिली जाते. नुकत्याच झालेल्या लोकसभेमध्येही तेली समाजावर अन्याय करण्यात आला. प्रत्येक पक्ष हा आम्हाला गृहित धरून चालतो. त्यामुळे तेली समाजाला प्रतिनिधीत्व न दिल्यास यापुढे कुठलाही पक्ष असला तरी समाज त्यांच्या उमेदवाराला पाडेल असा इशारा डॉ. भूषण कर्डिले यांनी दिला.