नागपूर: “नाच रे मोरा…” पाऊस पडला की हे गाणे हमखास तोंडी आलेच म्हणून समजा. पावसात मोराला नाचताना पाहणे कुणाला नाही आवडणार! कारण पावसाळ्यातील त्याची ही नृत्यलीला सर्वाधिक संमोहित करणारी गोष्ट.
पावसाळा हा ऋतू मोराच्या विणीचा, प्रजननाचा काळ. मोराला प्रजननक्षम होण्यासाठी सुमारे तीन वर्षाचा कालावधी लागतो, तर लांडोर दोन-तीन वर्षाच्या दरम्यान वयात येते. मोराचा पिसारा पूर्ण बहरात यायला मात्र पाच ते सहा वर्षाचा कालावधी लागतो. मात्र, पिसारा बहरात आल्याशिवाय लांडोर म्हणजेच मादी त्याला अजिबात भाव देत नाही. नराचा पिसारा दरवर्षी झडतो आणि विणीच्या हंगामा आधी ही पिसे परत वाढतात. हा पिसारा त्याच्या प्रजननासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे. कारण पिसाऱ्याच्या लांबीवर आणि चमकदारपणावर मादी आकर्षित होते. एक मोर चार ते पाच लांडोरसोबत प्रणय करतो.
मोर पावसाळ्यातच नाचतो हा समज कालिदासाच्या मेघदुतममधून आला असावा, अशी शक्यता आहे. कारण त्यानंतरच्या सर्व कथा-कवितांमध्ये अशीच वर्णने सापडतात. पण प्रत्यक्षात मात्र मोर पावसाच्या आनदांत नाचत नसून माद्यांना आकर्षित करण्याच्या हेतूने नाचतो. कारण हा त्यांचा विणीचा, प्रजननाचा काळ असतो. त्यामुळे मोराचा विणीचा हंगाम आणि पावसाचा दृढ संबंध आहेच.