मागील काही दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने रविवारी रात्रीपासून विदर्भात जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे वर्धा, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोलीत पुन्हा पूरस्थिती उद्भवल्याचे चित्र आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून अनेक मार्गावरील वाहतूक ठप्प पडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वर्धेत पूरग्रस्त कुटुंबांचे स्थलांतर –

रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने वर्धा जिल्ह्यातील अनेक मार्ग ठप्प पडले असून काही ग्रामस्थांना स्थलांतरित करण्यात आले आहे. हिंगणघाट तालुक्यातील पोथरा नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने सावंगी ते हेटी मार्ग, हिंगणघाट ते पिंपळगाव, यशोदा नदीला पूर आल्याने भगवा ते चानकी व अलंमडोह ते अल्लीपूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. कारंजा तालुक्यात सावरडोह नाल्याला पूर आल्याने वाहतूक बंद करण्यात आली. सेलू तालुक्यातील बोरखेडी कला येथे सततच्या पावसाने नाल्याला पूर आला. पहाटे दोन वाजता काही घरात पाणी शिरल्याने पूरग्रस्त कुटुंबांना अन्यत्र हलविण्यात आले.

PHOTOS : विदर्भात पावसाचा पुन्हा कहर

यवतमाळ : इसापूर, बेंबळा, अडाण धरणातून विसर्ग वाढविला –

रविवार सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाचा सोमवारी सकाळपासून जोर अधिक वाढल्याने बेंबळा, अडाण, इसापूर, अधरपूस प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पुराची धडकी भरली आहे. दारव्हा तालुक्यातील अडाण प्रकल्पाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहे. इसापूर धरणाच्या वरील बाजूस असलेल्या जयपूर बॅरेजमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडला आहे. बेंबळा धरणाचे १४ तर अधरपूस प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहे. पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन ठप्प झाले आहे.

अमरावती जिल्‍ह्यात मुसळधार; वरूड तालुक्‍यात पूरस्थिती –

अमरावती जिल्‍ह्यात रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्‍या मुसळधार पावसामुळे पुन्‍हा एकदा जनजीवन विस्‍कळीत झाले असून वरूड तालुक्‍याला पुराचा मोठा फटका बसला आहे. वरूड शहरातील सखल भागात पुराचे पाणी शिरले असून अनेक घरांची पडझड झाली आहे.

जरूड, सातनूर, गव्‍हाणकूंड, बहादा, शेंदूरजनाघाट येथे पूरस्थिती आहे. वरूड, जरूड, मांगरूळ, शेंदूरजनाघाट येथील सखल भागांमध्ये काही फूट पाणी शिरल्याने नागरिकांना दुसरीकडे आश्रय घ्यावा लागला. शेकदरी प्रकल्प ओसंडून वाहू लागल्‍याने शेंदूरजना घाट, जरूड, मांगरुळी पेठ या गावातील जीवना, देवना, चुडामणी, सोकी या नद्यांना पूर आला. नदीशेजारील वस्त्यांमध्ये पाणी शिरले. जरूड येथील रविवार बाजार व नदीकाठच्या घरांमध्‍ये पाणी शिरले. वरूड शहरातील शनिवारपेठ, मिरची प्लॉटही पाण्याखाली गेला.

याशिवाय, चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे मूलचेरा-आष्टी, आलापल्ली-भामरागड आदी मार्ग बंद झाले आहेत. अकोला जिल्यातदेखील रविवारी रात्री मुसळधार पाऊस झाला.