लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : शहरात गुंडांच्या टोळ्यामध्ये पिस्तूल वापर करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येक गुन्हेगारांच्या टोळीकडे मध्यप्रदेश-उत्तरप्रदेशातून आणलेल्या देशी बनावटीच्या पिस्तूल आढळून येत आहेत. तसेच शहरात सुपारी किलींगचे प्रकार वाढत असून कुख्यात गुन्हेगारांचा मोठ्या हत्याकांडात समावेश असल्याचे समोर येत आहेत. नुकताच ऋषी खोसला हत्येच्या सुपारीचा हप्ता मागण्यासाठी धारदार शस्त्राच्या धाकावर दरोडा घालणाऱ्या पाचव्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

शेख अफसर उर्फ अफसर अंडा शेख युसूफ (५२, रा. आयबीएम रोड, गिट्टीखदान) असे या आरोपीचे नाव आहे. दरोड्याच्या घटनेपासून तो फरार होता. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक २ च्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या.

आणखी वाचा-विमानाचे डावे पंख तुटले; तब्बल २५ कोटींच्या नुकसान भरपाईचा…

घटनेत यापूर्वी पोलिसांनी आरोपी कुणाल हेमने (२७), विशाल उर्फ फल्ली गुप्ता (२२), सुजित घरडे (२३, सर्व रा. वाठोडा) आणि बावरी (२९ रा. बुटीबोरी) या चौघांना अटक केली होती. १२ ऑक्टोबरला चारचाकी वाहनाने आलेल्या आरोपींनी वाठोडा रहिवासी फिर्यादी आरीफ खान पठाण (२८) याला घेऊन गेले. शस्त्राच्या धाकावर दहा हजार रुपयाची मागणी केली. माहिती मिळताच फिर्यादीचे वडिल आणि पत्नीसुध्दा घटनास्थळी पोहोचली. वडिलांनी गयावया केली. मात्र, आरोपी ऐकण्यास तयार नव्हते. दहा हजार रुपये मिळाले नाही तर खून करण्याची धमकी दिली. या प्रकरणी प्राप्त तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी गुन्हेगार प्रवृत्तीचे असल्याने त्यांचा पोलिसांकडे नोंद आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी त्यांचा शोध घेतला. चौघेही हिंगणा येथील एका हॉटेलमध्ये दडून होते. पोलिसांनी सापळा रचून चोवीस तासांत त्यांच्या मुसक्या आवळल्या. परंतु, अफसर अंडा हा फरार होता.

आणखी वाचा-भाजपकडून तीनच तिकीट, तेली समाजाचा अपेक्षाभंग ?

जंगलातून केली अटक

अफसर अंडा हा कन्हान नदी पुलाजवळ, कामठी रोड, साई मंदीरा मागे, असलेल्या जंगलातील एका धार्मिक स्थळावर स्वत:ची ओळख लपवून राहत होता. माहिती मिळताच पोलिसांनी त्या परिसरात सापळा रचला. तो जंगलात पळून जात होता. पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख, संदीप चंगोले, महेंद्र सेडमाके, सुनील कुवर, संदीप पांडे, कमलेश आणि हवालदार गजानन चांभारे यांनी केली.

असे आहे प्रकरण

ऋषी खोसला हत्या प्रकरणात आरीफचा समावेश होता. ही घटना २०१९ मध्ये सदर पोलीस ठाण्याअंतर्गत घडली होती. कारागृहात आरोपी कुणाल आणि आरीफ हे दोघेही होते. ऋषी खोसलाची हत्या सुपारी देऊन करण्यात आली होती. सुपारीची रक्कम अलिकडेच मिळाली. त्यातील हिस्सा मागण्यासाठी आरोपी कारने आले होते. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली कार, कारमधून तीन पिस्तूल, दोन जिवंत काडतूस, दोन चाकू जप्त केले होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Widespread use of pistols in gangs of gangsters in nagpur doubts on police functioning adk 83 mrj