अविष्कार देशमुख

पर्यावरणाविषयी चिंता व्यक्त करीत सरकारने राज्यात प्लास्टिक बंदी जाहीर केली. या निर्णयामुळे राज्यातील लाखो जणांचा रोजगार हिरावला, शकडो कारखाने बंद झाले. मात्र आता करोनाशी दोन हात करताना मात्र बंदी असलेल्या प्लास्टिकचा सर्रास वापर सुरू आहे. बंदी घातलेल्या ‘नॉन व्होवन’ प्लास्टिकचा पीपीई संच, प्लास्टिकच्या हातमोज्यांमध्ये उपयोग केला जात आहे.

राज्य सरकारने २४ मार्च २०१८ रोजी महाराष्ट्रात ५० मायक्रॉन पेक्षा कमी जाडी असलेल्या प्लास्टिकच्या सर्व प्रकारांवर बंदी घातली होती. आता मात्र करोना संसर्ग टाळण्यासाठी सर्वत्र पीपीई संच, इतर साहित्यामध्ये प्लास्टिकचा वापर मोठय़ा प्रमाणात होत आहे. हे पीपीई संच नॉन व्होवन पासून बनले आहेत. त्यामुळे  बंदी  असतानाही सरकारच आपल्या नियमांची पायमल्ली करीत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, पीपीई संच नष्ट होते असा स्पष्ट उल्लेख त्यावर असल्याने प्लास्टिक व्यावसायिकांनी आक्षेप घेतला आहे. इतक्याच जाडीचे नष्ट होणारे प्लास्टिक आम्ही वापरत असताना त्यावर का बंदी घातली, असा त्यांचा सवाल आहे.

पीपीई संच अथवा करोना संबंधित साहित्यामध्ये  प्लास्टिकचा उपयोग होत असला तरी त्या सर्व साहित्याची निर्मिती याच काळात झाली आहे. त्यामुळे अद्याप कोणतीच कारवाई केली नाही. आम्ही सध्या प्रतिबंधित क्षेत्रात सोयी- सुविधा पुरवण्याच्या कामामध्ये व्यस्त आहोत.

– डॉ. प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी, महापालिका.