पत्नीला कार शिकविताना वाहन थेट रस्त्यालगतच्या खोल विहिरीत कोसळून पत्नी व मुलीचा मृत्यू झाला तर पती कसाबसा बचावला असून त्याचीही प्रकृती गंभीर आहे.देऊळगाव राजा नजीक आज गुरुवारी दुपारी हा भीषण घटनाक्रम घडला. रामनगर मधील शिक्षक अमोल मुरकुट दुपारी आपली पत्नी स्वाती मुरकूट हिला चिखली मार्गावर कार चालविणे शिकवत होते. यावेळी त्यांची कन्या सिद्धीसुद्धा सोबत होती.
हेही वाचा >>>वर्धा : पाळीव श्वानाच्या मुत्राशयातून काढले तब्बल १०८ खडे; पशुवैद्यक डॉ. संदीप जोगेंसह सहकाऱ्यांना यश
दरम्यान, ही कार अचानक अनियंत्रित होऊन रस्त्यालगतच्या ७० फूट खोल विहिरीत कोसळली. यावेळी अमोल मुरकुट कसेबसे विहिरीबाहेर आले. मात्र स्वाती व सिद्धी या मायलेकीचा करुण अंत झाला. दुपारी साडेतीन पर्यंत त्यांचे मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरूच होते. विहीर खूप खोल असल्याने व त्यात मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने अडचण येत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
हेही वाचा- चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात महिला ठार
देऊळगाव राजा नजीक झालेल्या दुर्दैवी व विचित्र दुर्घटनेला आणखी एक शोकांतिक घडली. विहिरीत असलेल्या मायलेकीचे मृतदेह काढण्याच्या प्रयत्नात एका युवकाने आपले प्राण गमावले. तसेच याच प्रयत्नात अन्य एक युवक गंभीर जखमी झाल्याचे दुर्देवी वृत्त आहे. पवन पिंपळे (२४, रा. देऊळगाव राजा) असे मृत युवकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार पवनने या ७० फूट खोल व गाळाने भरलेल्या विहिरीत उडी मारली. मात्र, तो पाण्याबाहेर न आल्याने घटनास्थळी असलेल्या नागरिकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मायलेकींचे मृतदेह काढण्यासाठी गेलेला पवन बाहेर आलाच नाही. गाळात फसून तो दगावल्याचा अंदाज आहे. दरम्यान, याच प्रयत्नात देऊळगाव मही (ता. देउळगाव राजा) येथील ज्ञानेश्वर ऊर्फ संजय हा युवक गंभीर जखमी झाला. विहिरीत कोसळलेली कार विहिरीच्या तळाशी असल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा- नागपूर : ॲड. उकेंची पोलीस कोठडीची मागणी करणारा अर्ज फेटाळला
दरम्यान, दुर्घटनेची माहिती मिळताच आमदार शिंगणे यांनी देऊळगाव राजा सामान्य रुग्णालयास भेट दिली. भीषण दुर्घटनेतून कसेबसे वाचलेल्या परंतु पत्नी स्वाती व कन्या सिद्धी यांना गमावणारे अमोल मुरकूट यांचे त्यांनी सात्वन करून त्यांना धीर दिला. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी चर्चा करून माहिती घेतली.