भंडारा : नातेवाईकांकडचे लग्नकार्य आटोपून नागपूरला रिसेप्शनसाठी परत जात असताना पाचगाव जवळील कुही फाट्यावर झालेल्या चारचाकीच्या अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर पतीसह अन्य दोघे गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना १४ एप्रिल रोजी सोमवारी रात्री बारा वाजताच्या दरम्यान घडली. जखमींना तातडीने नागपूर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
या अपघातात भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव कोहली येथील रहिवासी कृष्णा फर्निचर मार्टचे मालक कृष्णा शेंडे यांची पत्नी नीलम शेंडे (वय२६) हिचा जागीच मृत्यू झाला. त्यांची तीन वर्षाची मुलगी देवाशी तर कृष्णा यांचा मेहुणा हेमंत असे तिघे गंभीर जखमी झाले.
कृष्णा शेंडे हे आपल्या परिवारासह त्यांच्या नागपूर येथील नातेवाईकांकडे लग्न सभारंभास गेले होते.तेथून ब्रम्हपुरी येथे लग्नकार्य आटोपून सोमवारी रात्री परत रिसेप्शनसाठी ते नागपूरला स्वतःच्या चारचाकी वाहनाने जात असताना पाचगाव जवळील कुही फाट्यावरील उड्डाण पुलावर अचानक चारचाकी वाहन दुभाजकावर आदळले व उलटले. यात कृष्णा शेंडे यांची पत्नी नीलम शेंडेचा जागीच मृत्यू झाला. तर स्वतः कृष्णा शेंडे अत्यंत गंभीर अवस्थेत असल्याची माहिती आहे. सदर घटनेची माहिती मिळताच अपघातग्रस्तांना नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.