नागपूर : पतीने दारूच्या नशेत शिवणयंत्रावर डोके आपटून आत्महत्या केल्याचा बनाव पत्नीने केला. मात्र, पोलीस तपासात सत्य उघडकीस आले. पती वारंवार चारित्र्यावर संशय घेत असल्याने पत्नीनेच त्याच्या डोक्यावर लोखंडी सळीने हल्ला करून खून केल्याचे स्पष्ट झाले. ज्ञानीराम मनराखन यादव (३५, मोहनलाल वाजपेयीनगर, कळमना) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी राणी यादव (३५) हिला पोलिसांनी अटक केली.

ज्ञानीराम यादव याचा राणीसोबत १६ वर्षांपूर्वी विवाह झाला होता.  दारूचे व्यसन असल्यामुळे तो कामधंदा करीत नव्हता. त्यामुळे राणी कपडे शिवून दोन मुलांचा उदरनिर्वाह करीत होती. ज्ञानीराम दारू पिऊन पत्नी राणी आणि मुलांना मारहाण करीत होता. तिच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत असे. तिच्याकडून पैसे हिसकावून दारू पित असे. नेहमीच्या कटकटीला कंटाळून राणीने त्याला संपवण्याचे ठरवले. ३० जुलैला नेहमीप्रमाणे ज्ञानीराम दारू पिऊन घरी आला आणि पत्नीसह मुलांना मारहाण केली. त्यानंतर तो झोपला. मध्यरात्री बारा वाजताच्या सुमारास राणीने पतीचा ओढणीने गळा आवळला. परंतु, त्याने विरोध केल्यानंतर तिने त्याच्या डोक्यात लोखंडी सळीने वार केला. त्यात ज्ञानीरामचा मृत्यू झाला. दरम्यान, राणीने आरडाओरड करून शेजाऱ्यांना बोलावले. पतीने शिवणयंत्रावर डोके आपटून आत्महत्या केल्याचा बनाव केला. कळमना पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. शवविच्छेदन अहवालात ज्ञानीरामचा लोखंडी वस्तूने वार केल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कळमना पोलिसांनी राणी यादवला ताब्यात घेतले. तिने पतीचा खून केल्याची कबुली दिली. याप्रकरणी पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल करून राणीला अटक केली.

Story img Loader