अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या पतीचा पत्नीने गळा आवळून खून केला. त्यानंतर पतीने आत्महत्या केल्याचा बनाव रचून पोलिसांना माहिती दिली. मात्र, पोलिसांनी प्रकरणाचा छडा लावत पत्नीविरुद्ध हत्याकांडाचा गुन्हा दाखल करून अटक केली. नामदेव (३०) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर विद्या असे आरोपी पत्नीचे नाव आहे. न्यायालयाने विद्याला ५ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नामदेव हा एका बंगल्यावर शेतीची काम करतो. त्याचे विद्यासोबत १० वर्षांपूर्वी लग्न झाले. त्यांना मुलबाळ होत नव्हते. त्यामुळे दोघेही पती-पत्नी तणावात वावरत होते. २ डिसेंबरला विद्याने पोलिसांना माहिती दिली की पती नामदेव याने आत्महत्या केली आहे. मौद्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंतकुमार खराबे यांनी घटनास्थळावर पाहणी केली असता संशय आला. त्यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. खराबे यांनी विद्या हिला ताब्यात घेतले आणि तिची कसून चौकशी केली असता तिने पतीचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. विद्याचे घरासमोर असलेल्या पानठेला चालक किरणशी अनैतिक संबंध होते. पती कामावर गेल्यानंतर किरण हा विद्याच्या घरी येत होता. त्याची कुणकुण नामदेव याला लागली होती. त्यामुळे घरात अनेकदा पती-पत्नीत वाद होत होते. नामदेव विद्याला किरणशी असलेल्या अनैतिक संबंधावरून मारहाण करीत होता.
घटस्फोट देण्यास नकार
विद्याने किरणशी असलेल्या प्रेमसंबंधाची पती नामदेव याला माहिती दिली. विद्याने शेती नावावर करून मागितली असता त्याने नकार दिला. तसेच मुलबाळ होत नसल्यामुळे किरणशी प्रेमसंबंध कायम ठेवणार असल्याचे तिने पतीला बजावले होते. घटस्फोट घेतल्यानंतर ती किरणशी लग्न करणार होती. त्यामुळे तिने पतीला घटस्फोट मागितला. परंतु, नामदेव घटस्फोट देण्यास तयार नव्हता.
खून करण्याचा रचला कट
१ डिसेंबरला रात्री नामदेव घरी आल्यानंतर विद्याने त्याला घटस्फोट देण्याबाबत विचारणा केली. त्याने पुन्हा नकार दिल्यामुळे तिने पतीचा काटा काढण्याचा कट रचला. मध्यरात्रीच्या सुमारास झोपेत असलेल्या नामदेव यांचा गळा दोरीने आवळला. त्याचा काही क्षणातच जीव गेला. त्यानंतर तिने प्रियकर किरणला रात्री फोन केला. त्याला घरी बोलावून घेतले व पतीचा खून केल्याची माहिती प्रियकराला दिली. त्यानंतर पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव रचण्यात आला.