गोंदिया : दोन अपत्ये झालीत, तिसरा होऊ नये म्हणून शासनाच्या नियमाचे पालन करीत आणि आपली आर्थिक स्थिती लक्षात घेऊन पतीने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेतली. मात्र, पत्नी आठ महिन्याची गर्भवती असल्याचे समोर येताच त्याला धक्का बसला. हा प्रकार येथील सातगाव आरोग्य केंद्रांतर्गत साखरीटोला येथे उघडकीस आला.
विवेक गोपीचंद खांदारे यांना दोन अपत्य आहेत. शासनाच्या धोरणानुसार मर्यादित अपत्य संख्या ठेवण्याची जबाबदारी स्वीकारून विवेकने ५ ऑक्टोबर २०२१ ला प्राथमिक आरोग्य केंद्र सातगाव येथे स्वतः कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेतली. डॉ. अभय पाटील यांनी ही शस्त्रक्रिया केली. मात्र यानंतरही त्यांची पत्नी आठ महिन्याची गर्भवती राहिली. ही बाब पती-पत्नीला चार महिने झाल्यानंतर कळली तेव्हा ते आरोग्य केंद्रात गेले. तालुका वैद्यकीय अधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित खोडणकर यांनी त्यांना के.टी.एस. जिल्हा सामान्य रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर अनेकदा प्राथमिक आरोग्य केंद्रात संपर्क केला मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. डॉक्टरांनी वेळीच योग्य सल्ला न दिल्यामुळे विवेक खांदारे यांनी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, पोलीस स्टेशन सालेकसा यांच्याकडे तक्रार करीत कारवाईची मागणी केली आहे.
हेही वाचा : हेही वाचा : गडचिरोली : पोलीस नक्षल चकमक, परिसरात शोधमोहीम सुरू
विवेक खांदारे मोलमजुरीची कामे करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. स्वतःच्या कमाईत तीन अपत्याचे पालनपोषण करणे शक्य नसल्याने व शासन नियमानुसार दोनच अपत्य असावे, यासाठी त्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली. मात्र, डॉक्टरांच्या चुकीमुळे पत्नी तिसऱ्यांदा गर्भवती राहिली आहे. तिसरे अपत्य जन्माला आल्यास त्याचे पालनपोषण कसे करायचे, त्याची जबाबदारी कोण घेईल, असे प्रश्न पती-पत्नीसमोर उभे ठाकले आहेत.