भंडारा : पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणाऱ्या पतीच्या दुसऱ्या लग्नाचा डाव पत्नीने मोडून काढला. पती पुन्हा लग्न करीत असल्याची माहिती मिळताच ती विवाह सोहळ्यात पोहचली. ही घटना मुंबईच्या कल्याण पूर्वेतील दर्शन विवाह सभागृहात घडली. पहिल्या पत्नीच्या तक्रारीवरून खेमराज बाबुराव मूल (४०, रा. मासळ, लाखांदूर तालुका) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खेमराजने १५ वर्षांपूर्वी गावातीलच एका तरुणीसोबत प्रेमविवाह केला होता. या दाम्पत्याला १३ वर्षांचा मुलगाही आहे. काही महिन्यांपूर्वी पती-पत्नीमधील घरगुती वादातून पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे दोघेही वेगळे राहत होते. पतीने स्थानिक जिल्हा न्यायालयात पत्नीपासून घटस्फोटासाठी याचिका दाखल केल्याचीही माहिती आहे.
हेही वाचा >>> उपराजधानीत गुंडाराज! पॅरोलवरील गुंडाचा प्रेयसीसमोरच खून
पत्नीला घटस्फोट न देता अंधारात ठेवून पतीने दुसऱ्या तरुणीसोबत विवाहाचा निर्णय घेतला. कुणालाही कळू न देता त्याने मुंबई येथे लग्न करायचे ठरवले. मात्र, या दुसऱ्या लग्नाची माहिती मिळताच पहिली पत्नी १३ वर्षाचा मुलगा आणि कुटुंबातील इतर सदस्यांसह विवाह समारंभात पोहोचली आणि उपस्थित पाहुण्यांना ती नवरदेवाची पहिली पत्नी असल्याची माहिती दिली. हा सर्व प्रकार एकून उपस्थितांना धक्का बसला. तत्काळ ही माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला.