मेट्रो रेल्वेचे खांब जसजसे उभे होऊ लागले आहेत तसतशी तिच्या विषयीची उत्सुकता जनसामान्यांमध्ये वाढू लागली आहे. स्थानकांची संकल्पित छायाचित्रे जरी केल्यानंतर त्यात आणखी भर पडली. नागपूर मेट्रो ही देशातील सर्वोत्तम असावी असा प्रयत्न महामंडळाचा असून त्या दिशेने पावले टाकली जात आहे. मेट्रोच्या प्रत्येक डब्यात वायफायची सोय असणार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून डब्यातील घडामोडींवरही लक्ष ठेवले जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वर्धा मार्गावर सध्या मेट्रोसाठी लागणारे खांब उभारणीचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. दोन खांब तयार झाले असून असे एकूण १४ खांब लागणार आहेत. पुढील चार महिन्यात म्हणजे सप्टेंबपर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे त्यावर टाकण्यात येणारे ‘सेगमेन्ट’ तयार करण्याचे कामही खापरीमध्ये सुरू आहे. स्थानकांचे डिझाईन तयार असून त्यावरही लवकरच शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.

मेट्रोच्या बांधकामासोबतच रेल्वेचे डबे तयार करतानाही प्रवाशांची सोय आणि सुरक्षिततेवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मेट्रोमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या गरजा लक्षात घेता प्रत्येक डब्यात वायफायची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे.

यामुळे डब्यातील घडामोडींवर लक्ष ठेवणे सोयीचे ठरेल. विशेषत: महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही आवश्यक आहे. डब्यात काही गोंधळ झाल्यास तात्काळ पुढच्या स्थानकावर त्याची दखल घेऊन कार्यवाही करणे सोयीचे ठरेल, तशी संगणकीय यंत्रणा गाडीत बसवण्यात येणार आहे.

आराखडय़ात बदल

एखाद्या मोठय़ा प्रकल्पाचे काम सुरू झाल्यावर सामान्यपणे आराखडय़ात बदल केले जात नाही, मात्र मेट्रो प्रकल्प त्याला अपवाद ठरला आहे. राज्य सरकारने सहकार्य केल्याने काँग्रेसनगरकडून जाणाऱ्या मार्गात बदल करणे महामंडळाला शक्य झाले आहे. कारागृहाच्या जमिनीचा प्रश्न असतानाही राज्य सरकारने याबाबत तात्काळ निर्णय घेऊन त्यावर तोडगा काढला.सरकारने मनावर घेतले तर काहीही होऊ शकते त्याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wifi and cctv in nagpur metro