भंडारा : वाट चुकलेले एक रानडुक्कर थेट जिल्हा परिषदेच्या शाळेत शिरल्याने एकच गोंधळ उडाला. ही घटना तुमसर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा चुल्हाड येथे घडली. तब्बल सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर या रानडुकराला वनविभागाने जेरबंद केले. चुल्हाड येथील जिल्हा परिषद शाळेत स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी मंडप उभारणीचे काम सुरू होते.
दरम्यान, सकाळी ७ वाजताच्या सुमारास रानडुक्कर शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये शिरले. सुदैवाने यावेळी शाळेचे विद्यार्थी नव्हते. रानडुक्कर शाळेत असल्याची माहिती ग्रामस्थांना होताच त्यांनी शाळेकडे धाव घेतली व वनविभागाला माहिती दिली. तुमसर वनपरिक्षेत्र कार्यालयाचे अधिकारी आणि सिहोरा पोलीस पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले व रानडुकराला पकडण्याचे प्रयत्न सुरू झाले. सात तासाच्या प्रयत्नानंतर या रानडुकराला जेरबंद करण्यात आले. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी छगनलाल रहांगडाले यांच्या मार्गदर्शनात बपेराचे डेव्हीड मेश्राम, काहूलकर, सेलोकर, वासनिक, शेख यांनी केली.