तुमसर : शहरातील गोवर्धन नगर येथील साई कॉलोनीत भर रात्रीच्या दरम्यान रानडुकराचा कळप लोक वस्तीत शिरून एका महिलेवर हल्ला केला, तसेच दुचाकीला धडक दिली. मात्र, दुचाकीस्वार थोडक्यात बचावला.
रविवारी रात्रीच्या नऊ वाजता घडलेल्या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रानडुकरांचा हल्ल्यात शिला टिळके ह्या थोडक्यात बचावले, तर ईशान शेंद्रे यांनाही चांगलीच दुखापत झाली आहे. शहरात वन्य प्राण्यांचा उच्छाद दिवसेंदिवस वाढतच आहे. आजवर शेतातील पिकात धुमाकूळ घालणाऱ्या वन्यप्राण्यांनी आता लोकवस्तीकडे धाव घेतली आहे. तुमसर शहरातील गोवर्धन नगर येथील साई कॉलोनी परिसरात रानडुकरांचे कळप भर रात्रीला शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा… अमरावती : धक्कादायक! प्रेयसीचे आक्षेपार्ह छायाचित्रे व चॅटिंग नियोजित वराला पाठवली
सदर घटना परिसरामध्ये वाऱ्यासारखी पसरली असल्याने महिला, लहान बालकांसह लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील गोवर्धन नगर येथील एका खाजगी मोकळ्या जागेत झाडी झुडपी मोठ्या प्रमाणात वाढल्याने नगरपरिषदेने येथे लक्ष देऊन स्वच्छता करण्याची मागणी आरोग्य अधिकाऱ्यांकडे शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित एच. मेश्राम यांनी सोमवारी केली होती. या अनुषंगाने नगरपरिषदेने याप्रकरणी दखल घेऊन आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी जेसीबी पाठवून स्वच्छता करण्याचे आदेश दिले आणि कामाला सुरुवात झाली. रानडुकरांचा बंदोबस्त वनविभागाने करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केल्या जात आहे.