लोकसत्ता टीम
गडचिरोली : भामरागड तालुक्यातील हिदूर येथील एका महिलेचा रानटी हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. २५ एप्रिलरोजी कियर येथील एका शेतकऱ्यास दुपारी ठार केल्यानंतर रात्री त्याच रानटी हत्तीने हिदूर गावात धुडगूस घालून तीन महिलांना गंभीर जखमी केले. त्यापैकी राजे कोपा हलामी (५०) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर महारी देवू वड्डे (५०) आणि वंजे जुरू पुंगाटी (४७) या दोघी गंभीर जखमी आहेत.
महिनाभरापूर्वी कळपातून भरकटलेल्या या हत्तीने तेलंगणा राज्यात दोन शेतकऱ्यांना ठार करून तीन दिवसांपूर्वी भामरागड तालुक्यात प्रवेश केला. काल पहाटे या तालुक्यातील कोसफुंडी गावात सर्वप्रथम हत्तीचे दर्शन झाले. त्यानंतर तो कारमपल्ली-टेकला जंगलात गेला. त्यानंतर दुपारी ४ वाजताच्या सुमारास कियर येथील शेतशिवारात काम करीत असलेल्या गोंगलू तेलामी नामक शेतकऱ्याला पायाखाली तुडवून ठार केले. त्यानंतर हा हत्ती त्या भागातून पसार होऊन आरेवाडा परिसरातील हिदूर या गावात गेला.
आणखी वाचा-वर्धा : शहरी तुलनेत ग्रामीण भागात टक्का वाढला, महिला मतदारांमध्ये निरुत्साह
याठिकाणी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास सुरु असलेल्या माता पूजनाच्या कार्यक्रमात त्याने धुडगूस घालून महारी वड्डे, राजे आलामी व वंजे पुंगाटी यांना गंभीर जखमी केले. तिन्ही महिलांना भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दुखापत गंभीर स्वरूपाची असल्याने त्यांना चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान राजे कोपा हलामी (५०) हिचा रुगणल्यात मृत्यू झाला. इतर दोघींची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते. उपवनसंरक्षक शैलेश मीना, गट्टा वनपरीक्षेत्र अधिकारी योगेश शेरेकर आणि भामरागड वनपरीक्षेत्र अधिकारी अमर भिसे हे, ड्रोन, हुल्ला पथक व वनविभागाच्या चमूसह या हत्तीवर नजर ठेऊन आहेत.
दक्षिण गडचिरोलीत नासधूस
दरम्यान, सात ते आठ रानटी हत्तींचा एक कळप गडचिरोली तालुक्यात धुडगूस घालत आहे. पोर्ला वनपरीक्षेत्रात असलेल्या या कळपाने आपला मुक्काम आंबेशिवणीकडे हलविला. तेथे जंगलात धुडगूस घातल्यानंतर आता हत्तींनी आंबेशिवणीकडे धाव घेतली. तेथे उन्हाळी धानासह भाजीपाला पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे.