गोंदिया : चार दिवसांपूर्वी गोंदिया जिल्ह्यातून भंडारा जिल्ह्यात गेलेला हत्तींचा कळप सोमवारी रात्री लाखांदूर तालुक्यातून सालेबर्डीमार्गे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगावदेवी परिसरातील वनपरिक्षेत्र क्र. २८२ मध्ये परतला. वनविभागाने बोंडगावदेवी व परिसरातील शेतकरी आणि गावकऱ्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
रानटी हत्तींचा कळप चार दिवसांपूर्वी साकोलीमार्गे भंडारा जिल्ह्यात दाखल झाला होता. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला होता. मात्र, हा कळप सालेबर्डी तलावमार्गे सोमवारी रात्रीच्या सुमारास अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगावदेवी वनपरिक्षेत्र क्रमांक २८२ मध्ये पुन्हा परतला. सध्या खरीप हंगामातील धानाच्या कापणी आणि मळणीची कामे सुरू असल्याने शेतकरी सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत शेतातच असतात. त्यामुळे त्यांना हत्तींच्या कळपापासून धोका होऊ नये, याची खबरदारी घेतली जात आहे.
‘ड्रोन’द्वारे हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. रानटी हत्तींचा कळप दररोज आपला मार्ग बदलवत होता. त्यामुळे त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी ड्रोनची मदद घेतली जात आहे. जवळील गावात दवांडीद्वारे याबाबतची माहिती ग्रामस्थांना दिली जात असून खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात असल्याचे सहायक वनसंरक्षक दादा राऊत यांनी ‘लोकसत्ता’शी बोलतानी सांगितले.