गोंदिया जिल्ह्यातून पुन्हा गडचिरोलीत परतलेल्या रानटी हत्तींच्या कळपाने गुरुवारी रात्री कोरची तालुक्यातील लेकुरबोडी गावात धुमाकूळ घातला. यात शेती व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सनकुबाई कोलुराम नरेटी (८० ) ही वृद्ध महिला गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी गडचिरोली जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
छत्तीसगडवरून गडचिरोली जिल्ह्यात दाखल झालेला रानटी हत्तींचा कळप महिनाभरापासून जिल्ह्यात मुक्कामी असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. दरम्यान, या हत्तींनी लगतच्या गोंदिया जिल्ह्यातही धुमाकूळ घातला होता. आता पुन्हा या कळपाने गडचिरोलीतील कोरची तालुक्यात प्रवेश केला आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास बेळगाव वनपरिक्षेत्रातील लेकुरबोडी गावात या कळपाने धुमाकूळ घालत मोठ्या प्रमाणत शेती व घरांचे नुकसान केले. यात सनकुबाई नरेटी गंभीर जखमी झाल्या. दरम्यान, हत्तींचा धोका लक्षात घेता वन विभागाचे कर्मचारी या परिसरात ठाण मांडून आहे. आता हा कळप गावापासून ५ किमी अंतरावर असल्याची माहिती बेळगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मीकांत ठाकरे यांनी दिली.