लोकसत्ता टीम
गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यात काही वर्षांपासून रानटी हत्तींनी बस्तान मांडले आहे. मी त्याबद्दल बऱ्याचदा वाचले. या भागातील वन्यजीवांच्या उपस्थितीमुळे येथील समृध्द वनसंपदेची प्रचिती सर्वांना येते आहे. त्यामुळे ताडोबाच्या धर्तीवर गडचिरोलीतही पर्यटन उभे राहू शकते. असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी व्यक्त केले. ते अहेरी येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
आणखी वाचा-अप्पर वर्धा धरण तुडूंब, पण शहानूर अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत… कारण काय, जाणून घ्या
न्यायमूर्ती गवई पुढे म्हणाले की, माझे गडचिरोलीवर विशेष प्रेम आहे. जिल्ह्यातील बहुतांश न्यायलयाचे उद्घाटनासाठी बऱ्याचदा मी येथे आलेलो आहे. येथील वनसंपदा, वन्यजीव बघितल्यास गडचिरोलीत जिल्ह्यावर निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केल्याचे दिसून येते. काही वर्षांपासून येथील जंगलात स्थलांतरित रानटी हत्ती मुक्कामी आहेत. लगतच्या जिल्ह्यात ताडोबासारखे मोठे पर्यटन केंद्र आपण पाहतो आहे. त्याच धर्तीवर गडचिरोलीतील वनसंपदा आणि येथील वन्यजीव पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे ठरू शकते. असे सांगून गवई यांनी खनिज संपत्तीचा विकासाच्या दृष्टीने वापर झाला पाहिजे हेही आवर्जून नमूद केले.