गडचिरोली: गेल्या तीन वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या रानटी हत्तींनी २९ सप्टेंबररोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास प्रथमच गडचिरोली शहराच्या सीमेत प्रवेश केल्याने वनविभागाची चांगली तारांबळ उडाली .दुपारी मसेली परिसरात तर सायंकाळी वाकडी व सेमाना देवस्थानच्या मध्यभागातील जंगलात कळपाचा वावर होता. यामुळे वन विभाग व हुल्ला टीमला चामोर्शी मार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी काही काळ रोखावी लागली.मागील आठ दिवसांपासून रानटी हत्तींचा कळप पोर्ला वनपरिक्षेत्रातील चुरचुरा उपक्षेत्रात वावरत होता. या भागातील नवरगाव, कोडना, साखरा, गोगाव, महादवाडी, कुन्हाडी आदी भागातील शेतकऱ्यांच्या पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस केली.त्यानंतर गोगावलगतच्या नागोबा देवस्थान परिसराच्या शेतशिवारात शनिवारी पीक पायदळी तुडविले. त्यानंतर रात्रीच्या सुमारास कळपाने खरपुंडी गावाजवळची कठाणी नदी ओलांडून सालईटोला गावाच्या बाजूने माडेतुकूम परिसरातून गडचिरोली- धानोरा मार्ग ओलांडला. टेकडीवरील हनुमान मंदिर परिसरातून हा कळप पोटेगाव मार्गाच्या बाजूने मसली गावाच्या दिशेने गेला. रविवारी दुपारपर्यंत याच भागात हा कळपाचा वावरहोता. त्यानंतर सायंकाळी सेमाना उद्यान ते वाकडी फाट्याच्या मधोमध असलेल्या जंगलातून हत्तींनी चामोर्शी मार्ग ओलांडला. त्यांचा रोख मुडझा गावाच्या दिशेने होता. हत्तींचा वावर पाहून वन विभागाच्या पथकाने वाहतूक बंद केली. यावेळी नागरिकांना ध्वनिक्षेपकावर माहिती दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा