नागपूर : गडचिरोली जिल्ह्यातून गोंदिया आणि गोंदियातून भंडारा जिल्ह्यात आलेला सुमारे २३ रानटी हत्तींचा कळप आता कोका अभयारण्य, न्यू नागझिऱ्याच्या दिशेने कूच करीत आहे. राष्ट्रीय महामार्गापासून तीन किलोमीटर अंतरावर मोहघाटाच्या जंगलात सध्या त्यांचा मुक्काम आहे.
दिवसभर विश्रांती आणि रात्रीचा प्रवास करणाऱ्या हत्तींनी महामार्ग ओलांडल्यास ते न्यू नागझिऱ्यात आज रात्रीच प्रवेश करू शकतात. बंगालचे पथक आणि स्थानिक वनखात्याचे अधिकारी, कर्मचारी या हत्तींचा मागोवा घेत आहेत. बंगालचे पथक वनखात्याला मार्गदर्शन करत असून त्यानुसार हत्तींचा मागोवा घेतला जात आहे. नागझिऱ्याच्या जंगलात कधीकाळी हत्तींचे वास्तव्य होते. त्यामुळे या हत्तींनी नवीन नागझिऱ्यात प्रवेश केल्यास ते अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरेल. मात्र, अतिउत्साही गावकऱ्यांना या हत्तींपासून दूर ठेवण्यासाठी वनविभागाला चांगलीच मशागत करावी लागत आहे.