भंडारा : सध्या जिह्यात मुक्कामी असलेल्या रानटी हत्तींचा व्हीडिओ काढण्याचा मोह काही उपद्रवी तरुणांना आवरला नाही. मात्र, व्हीडिओ काढताना हत्तीच्या जवळ गेलेल्या या तरुणांना एका महाकाय गजराजाने चांगलीच अद्दल घडवली. तरुणांनी पळ काढून कसाबसा स्वतःचा जीव वाचविला. वनविभागाकडून वारंवार सूचना देऊनही अशाप्रकारे हत्तींच्याजवळ जाणे जीवावर बेतू शकते.
भंडारा वनविभागातअंतर्गत लाखनी वनपरिक्षेत्रातील बरडकिन्ही जंगलात गेल्या तीन दिवसांपासून मुक्कामी असलेल्या रानटी हत्तींनी आज पहाटे लाखनी तालुक्यातील पेंढरी जंगलाकडे त्यांचा मोर्चा वळवला. पेंढरीला जाण्यासाठी या हत्तींना शिवणी गावातील शेतातून जावे लागते. शुक्रवारी पहाटे रानटी हत्तींना शेतात पाहून काही स्थानिक खोडकर तरुणांनी त्यांचा पाठलाग सुरू केला आणि त्यांचा व्हीडिओ काढण्यास सुरुवात केली. व्हीडिओ बनवत असताना ते धावत असलेल्या हत्तींच्या अगदी जवळ आले आणि एका महाकाय हत्तीने पलटून या तरुणांना पळवून लावले.
हेही वाचा >>> वर्धा: डॉक्टर तुम्हीसुद्धा! परिचारिकेस मिठी मारून…
पाहा व्हिडिओ :
हा संपूर्ण थरार व्हीडिओमध्ये दिसत आहे. सेज (स्ट्राइप्स अँड ग्रीन अर्थ) संस्थेला आज सकाळी ७ वाजता हा व्हीडिओ मिळाला. त्यांनी सांगितले की, हा व्हीडिओ स्थानिक लोक वेगाने शेअर करत आहेत, त्यामुळे या हत्तींच्या मार्गावर लोकांची गर्दी जमू शकते. डीसीएफ राहुल गवई, भंडारा वनविभागाचे प्रमुख, सेजचे साग्निक सेनगुप्ता आणि मानद वन्यजीव रक्षक नदीम खान यांनी या हत्तींपासून लोकांनी दूर राहावे आणि इतरांनाही थांबवावे, असा इशारा दिला आहे. अशा घटनांमुळे केवळ जीवितहानी होवू शकते.
वन्यजीव संस्था, वन्यजीव प्रेमी आणि पत्रकारांनी लोकांना हत्तींबाबत वनविभागाच्या ‘काय करावे’ आणि ‘काय करू नये’ या पत्रकांमध्ये दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, चाबाबत जनजागृती करावी आणि सेजने बनवलेला हत्ती सहवास व्हीडिओ पाहून त्यांच्या नेटवर्कमध्ये प्रसार करावा.
– वनविभाग व सर्व मानद वन्यजीव रक्षक, भंडारा व गोंदिया