ओडिशा राज्यातून रानटी हत्तींचा कळप सोमवारी भंडारा जिल्ह्यातील संरक्षित वन असलेल्या साकोली क्षेत्रात पोहचला. सध्या या हत्तींचा मुक्काम मोहघाटा जंगलात असून, हत्तींवर लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाची विविध पथके जंगलात तळ ठोकून आहेत. पश्चिम बंगालच्या सेज संस्थेच्या हत्ती नियंत्रण पथकाचीही मदत घेतली जात आहे. वरिष्ठ वनाधिकारी मोहघाटा जंगलात तैनात आहेत.
भंडारा जिल्ह्यातील घनदाट जंगलात २०० वर्षांपूर्वी हत्तीचा मुक्तसंचार होता. १८२९ नवेगाव नागझिरा जंगलात हत्तींचे कळप दिसत होते. साकोली तालुक्यातील सानगडी वनपरिक्षेत्रात सोमवारी २३ हत्तींचा कळप दाखल झाला. कळपाने झाडगाव, केसलवाडा, सिलेगाव शेतशिवारातील धान आणि ऊस पिकांचे नुकसान केले. मंगळवारी हत्तीचा कळप मोहघाटा जंगलात पोहोचला. जिल्ह्यात हत्ती दाखल झाल्यापासून वनविभाग त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. मोहघाटा जंगलात गोंदिया येथील जलद प्रतिसाद दल, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे पथक तळ ठोकून आहेत. या परिसरात असलेल्या किटाडी, गिरोला (जापानी), बरडकिन्ही या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
भंडाराचे उपवनसंरक्षक राहुल गवई मंगळवारी दुपारपासूनच मोहघाटा जंगलात तळ ठोकून आहे. वनविभागाच्या फिरत्या पथकाचे प्रमुख वनपरिक्षेत्राधिकारी संजय मेंढे या हत्तींवर लक्ष ठेवून आहेत. हत्तीचा कळप लाखनी आणि साकोली तालुक्यातील मोहघाटा जंगलात असल्याने गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा: गडचिरोली : रानटी हत्तींचा कुरखेडा तालुक्यात मुक्तसंचार वाढला
सेज संस्थेची मदत
हत्ती नियंत्रणासाठी पश्चिम बंगालमधील सेज संस्थेची मदत घेतली जात आहे. सेजचे सदस्य सध्या मोहघाटा जंगलात तळ ठोकून आहे. हत्तीच्या हालचाली आणि मार्गक्रमण यावर त्यांची नजर असून, हत्तीचा कळप कोणत्या दिशेला जाऊ शकतो, याचा अंदाज घेत आहेत.
वन कर्मचाऱ्यांचे पथक तळ ठोकून
मोहघाटा जंगलात असलेले हत्ती मानवी वस्तीत शिरणार नाहीत, याची दक्षता वनविभागाकडून घेतली जात आहे. भंडारा वनविभागाचे सुमारे ६० कर्मचारी जंगल परिसरात तैनात आहेत. ड्रोन कॅमेऱ्याद्वारे हत्तीच्या हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे.
हेही वाचा: रानटी हत्ती गावात अन् गावकरी विस्थापित ; नागनडोहवासियांची दिवाळी आश्रय छावणीतच !
हत्तींचा कळप मोहघाटा जंगलात असून त्यांच्यावर वनविभाग लक्ष ठेवून आहे. मानवी वस्तीत हत्ती येणार नाही याची खबरदारी घेतली जात असून लगतच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. – राहुल गवई, उपवनसंरक्षक भंडारा
भंडारा जिल्ह्यात साधारणत: २०० वर्षांपूर्वी हत्तींचा संचार होता. कालांतराने त्यांचे स्थलांतरण झाले. आता पुन्हा हत्तींचा कळप जिल्ह्यात दाखल झाला आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी वनविभाग प्रयत्न करीत आहे. नागरिकांनी हत्ती पाहण्यासाठी गर्दी करू नये. – नदीम खान, मानव वन्यजीव संरक्षक