वर्धा : वन्य जीवप्रेमी बुद्ध पौर्णिमेची आतुरतेने वाट बघत असतात. कारण या दिवशी दरवर्षी वन खात्यातर्फे वन्यजीव गणना होत असते. पण अवकाळी व मुसळधार पाऊस, चिखलमय वाटा, झाडांची पडझड या कारणास्तव ही गणना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बोर व्याघ्र प्रकल्पात या उपक्रमासाठी सहभाग नोंदविणारे असंख्य असतात. त्यामुळे पाच व सहा मे रोजी मचाण बुकिंगसाठी ऑनलाइनवर धावपळ झाली. ज्यांनी अग्रिम पैसे देवून नोंदणी केली त्यांचे पैसे परत केले जाणार आहे. बोर सोबतच कूही, उमरेड वन विभागातीलसुद्धा रद्द झाल्याची माहिती आहे. या निर्णयाने वनप्रेमी निराश झाले आहेत.
विभागीय वन अधिकारी प्रमोद पंचभाई म्हणाले, की बोर, उमरेड व कुही वन विभागातील रस्ते खराब झाले आहेत. खराब हवामान असल्याने गणणेचा हेतू साध्य होणार नाही. पुढेही तशीच सूचना आहे. पेंच येथील रस्ते बरे असल्याने तेथे गणना होणार आहे.