नागपूर : वन्यजीव संरक्षण आणि संशोधन सोसायटी व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या संशोधकांच्या चमुने सरीसृप क्षेत्रात महत्त्वपूर्ण शोध लावला आहे. तामिळनाडूतील मदूराई जिल्ह्यातून पालीच्या हेमिडॅक्टीलस प्रजातीतील एक नवीन प्रजाती या संशोधकांनी शोधून काढली. हे संशोधन ‘एशियन जर्नल ऑफ कन्झर्वेशन बायोलॉजी’ यात प्रसिद्ध झाले आहे.
संशोधक अमित सय्यद यांच्या नेतृत्वात नवीन प्रजाती शोधून काढल्यानंतर तिचा सर्व बाजूने अभ्यास करण्यात आला. अमित सय्यद हे वन्यजीव संरक्षण आणि संशोधन सोसायटीचे संशोधक आहेत. प्रजाती नवीनच आहे ना, इतरत्र कुठे तिची नोंद तर नाही ना, आदी बाबी पुराव्यानिशी तपासण्यात आल्या. नवीन प्रजातींची अचूक ओळख आणि वर्गीकरण सुनिश्चित करण्यासाठी संशोधकांनी अत्याधुनिक तंत्रे आणि पद्धतींचा वापर करून विस्तृत क्षेत्र सर्वेक्षण केले. या नवीन प्रजातीचे नाव ‘हेमिडाक्टाइलसमुल्टिसलकाटस’ आहे. दक्षिण भारतात आम्ही हेमिडाक्टाइलसच्या अशा आणखी अज्ञात प्रजातींचा शोध घेत आहोता. त्यांचा शोध घेणे आवश्यक असल्याचे अमित सय्यद म्हणाले.
हेही वाचा >>> वर्धा : २४ देश आणि ३७ शिक्षक; भारतीय विवाह पद्धतीचा करणार अभ्यास
तामिळनाडूत ठराविक भागात नागमलाई हिल्समध्येच ही विशिष्ट पाल आढळते. ही पाल पूर्णपणे दगडांच्या पठारावर राहते. तसेच आजूबाजूच्या वस्तीतील घरांच्या भिंतीवर देखील आढळते. तिच्या पाठीवरचे खवले अतिशय वेगळे आहेत. समुद्री शिंपल्यासारखे ते दिसतात. त्या भागातील पक्षी, साप, इतर किटक अशा जैवविविधतेत या पालीची भूमिका महत्त्वाची आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे उपसंचालक व या संशोधनाचे सहलेखक राहुल खोत यांनी तामिळनाडूच्या मदुराई जिल्ह्यात हेमिडाक्टाइलसच्या या नवीन प्रजातीचा शोध लागणे ही आमच्यासाठी आनंदाची बाब असल्याचे सांगितले. हे शोध केवळ या प्रदेशातील वैविध्यपूर्ण वन्यजीवांबद्दलच्या आमच्या माहितीत भरच घालत नाहीत, तर जैवविविधता संवर्धनाच्या पुढील संशोधनाच्या महत्त्वावरही भर देतात, असे खोत म्हणाले.
वन्यजीव संरक्षण आणि संशोधन सोसायटी व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीसह तामिळनाडूतील अरुल आनंदर महाविद्यालय, साताऱ्यातील पोद्दार आंतरराष्ट्रीय शाळा, आसाममधील हेल्पअर्थ आणि महाराष्ट्रातील इनसर्च एन्वायर्नमेंटल सोल्यूशन्स यांचे सदस्य अमित सय्यद, सॅमसन किरुबाकरन, राहुल खोत, ओंकार अधिकारी, अयान सय्यद, मासुम सय्यद, जयदित्य पुरकायस्थ, शुभंकर देशपांडे आणि शौरी सुलाखे यांचे या संशोधनासाठी सहकार्य लाभले.