लोकसत्ता टीम

नागपूर: समृद्धी महामार्ग या भारतातील पहिल्या हरितमार्गाच्या निरीक्षणासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि भारतीय वन्यजीव संस्था यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे.

सामंजस्य कराराचा उद्देश वन्यप्राण्यांसाठी अनुकूल उपशमन रचनांच्या परिणामकारकतेचे मुल्यमापन करण्यासाठी त्याच्या वापरावर लक्ष ठेवणे हा आहे. यातील काही रचना वन्यप्राणी का टाळत आहेत, यामागील कारणेदेखील सांगितली जातील. त्यामुळे वन्यप्राण्यांसाठी उपयुक्तता सुधारण्यास मदत होईल. भारतीय वन्यजीव संस्थेच्या जबाबदाऱ्यांमध्ये ‘महामार्गाच्या वापराच्या टप्प्यात वन्यजीव भूयारी मार्ग व उड्डाणपूल देखरेख’ यावर अभ्यास करणे समाविष्ट आहे. पाच वर्षाच्या कालावधीत महामार्गाच्या वापराच्या टप्प्यात वन्यप्राण्यांच्या अवागमनाची व्याप्ती निश्चित करण्यासाठी तसेच भूयारी मार्ग व उड्डाणपूल वापरातील तात्पुरती भिन्नता तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येईल. सभोवतालची वनस्पती वैशिष्ट्ये, लँडस्केप वैशिष्ट्ये आणि वन्यजीवांच्या हालचालींचे तात्पुरते नमुने यासंबंधी विविध प्रजातींच्या वन्यप्राण्यांद्वारे वापरण्यासाठी उपशमन उपायांची परिणामकारकता देखील निर्धारित केली जाईल.

आणखी वाचा- अडते-व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक, ‘शाहू परिवार’ चे थेट पणन संचालकांना साकडे

भारतीय वन्यजीव संस्था विद्यमान वन्यजीव-अनुकूल शमन संरचनांमध्ये आवश्यक सुधारणांची माहिती देण्यासाठी गोळा केलेल्या माहितीचे विश्लेषण करेल आणि आवश्यक असल्यास अतिरिक्त उपाय सुचवेल.

समृद्धी महामार्ग हा वन्यप्राण्यांच्या हालचालीसाठी उड्डाणपूल आणि भूयारी मार्ग असलेला तसेच वन्यप्राण्यांच्या हालचालींसाठी नऊ हरित उड्डाणपूल तयार करणारा भारतातील पहिला महामार्ग ठरला आहे. बोर व्याघ्रप्रकल्प ते उमरेड-करांडला अभयारण्य यादरम्यानच्या वाघांच्या कॉरिडॉरमध्ये ३०० मीटर लांबीच्या भूयारी मार्गाव्यतिरिक्त पहिल्यांदाच नऊ उड्डाणपूल वन्यप्राण्यांसाठी बांधण्यात येत आहेत. या महामार्गाचे बांधकाम सुरु होण्याआधीपासूनच भारतीय वन्यजीव संस्था या प्रकल्पात सहभागी आहे. २०१८ ते २०१९ या कालावधीत संस्थेने वन्यप्राण्यांचे भ्रमणमार्ग ओळखण्यासाठी या संपूर्ण परिसराचे सर्वेक्षण केले. त्यानंतर त्यांनी वन्यप्राण्यांकरिता कोणत्या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या उपशमन योजना करायला हव्या, यासाठीचा अहवाल राज्यशासनाला दिला. वन्यप्राण्यांना रस्ता ओलांडण्यासाठी सुमारे एक हजार ७९७ रचनांचे नियोजन करण्यात आले. त्यापैकी २९५ रचना ह्या वन्यप्राण्यांचा सर्वाधिक वावर असणाऱ्या वन्यजीव क्षेत्रात आहेत.

Story img Loader