लोकसत्ता टीम

नागपूर : भारतीय संघाचा कणा असलेले रोहित शर्मा आणि विराट कोहली मागील अनेक वर्षांपासून क्रिकेटच्या मैदानात भारताचा नावलौकिक करीत आहे. भारतीय संघाला क्रिकेटच्या विश्वात पुढे नेण्यात दोन्ही खेळाडूंनी मोलाची भूमिका बजावली. रोहित शर्मा सध्या भारतीय संघाचा कर्णधारपदाची धुरा सांभाळत आहे तर विराट कोहली भारताचा स्टार फलंदाज आहे. येत्या ६ फेब्रुवारीपासून भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील महत्वपूर्ण तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. यातील पहिला सामना ६ फेब्रुवारी रोजी नागपूरच्या जामठा मैदानावर होणार आहे. नागपूरच्या मैदानावर भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा हा शेवटचा एकदिवसीय सामना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विराट दोनदा, रोहित एकदा सामनावीर

नागपूरच्या मैदानावर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची कामगिरी उत्तम राहिली आहे. विराट कोहलीने नागपूरमध्ये पाच सामन्यात ३२५ धावा केल्या . यात दोन शतके आणि एक अर्धशतकांचा समावेशक आहे. नागपूरमध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यांमध्ये कोहलीने दोनदा सामनावीर पुरस्कार पटकावला आहे. कोहलीने ५ मार्च २०१९ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ११६ धावा केल्या होत्या. १० ऑक्टोबर २०१३ रोजी कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ६६ चेंडूत नाबाद ११५ धावा केल्या. दोन्ही प्रसंगी कोहलीला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. रोहितने या सामन्यात ७९ धावा केल्या होत्या. १ ऑक्टोबर २०१७ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने १०९ चेंडूत १२५ धावा करत सामनावीर पुरस्कार जिंकला. कोहलीने या सामन्यात ३९ धावा काढल्या होत्या. रोहितने नागपूरमध्ये एकूण 3 डाव खेळले आहेत. एकदा तो शून्य धावांवरही बाद झाला आहे.

अंतिम सामना राहणार?

येत्या एक-दोन वर्षांत नागपूरमध्ये पुन्हा एकही एकदिवसीय सामने होणार नाही. ३८ वर्षीय रोहित आणि ३७ वर्षीय विराटने टी-२० विश्वचषकानंतर टी-२० आंतरराष्ट्रीय स्वरूपातून निवृत्तीची घोषणा केली होती. फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर कोणत्याही वेळी, क्रिकेटचे हे दोन दिग्गज खेळाडू नवीन खेळाडूंना संधी देण्यासाठी एकदिवसीय स्वरूप देखील सोडू शकतात. जर तसे झाले तर नागपूरच्या मैदानावरील या दोन महान खेळाडूंचा हा शेवटचा एकदिवसीय सामना ठरू शकतो.

कोहलीने १८ वर्षांपूर्वी आणि रोहितने १९ वर्षांपूर्वी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. नागपूरमधील जामठा स्टेडियम या दोघांसाठीही भाग्यवान ठरले आहे. त्यांनी या मैदानावर शतके झळकावली आहेत. नागपूरच्या जामठा स्टेडियमवर शेवटचा एकदिवसीय सामना सहा वर्षांपूर्वी ५ मार्च २०१९ रोजी खेळला गेला होता.

Story img Loader