अकोला : लोकसभा निवडणुकीसोबतच रिक्त झालेल्या अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आली. भाजपचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘अकोला पश्चिम’मध्ये भाजप उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात टाकतो, याबाबत उत्सुकता वाढली आहे. लोकसभेमध्ये खासदार पुत्र अनुप धोत्रे यांना भाजपने संधी दिली. विधानसभेच्या पोटनिवडणुकीत सुद्धा भाजप तोच कित्ता गिरवणार की नवा प्रयोग करणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
अकोल्यात लोकसभेसोबतच रिक्त असलेल्या अकोला पश्चिम विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा देखील बिगुल फुंगल्या गेला. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात तब्बल २९ वर्षे भाजपचा झेंडा फडकावणारे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा आमदार गोवर्धन शर्मा यांचे ३ नोव्हेंबर २०२३ रोजी निधन झाल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. पोटनिवडणूक होणार की नाही, ही संभ्रमावस्था होती. दरम्यान, निवडणूक आयोगाने लोकसभेसोबतच पोटनिवडणुकीवर शिक्कामोर्तब केले. पोषक वातावरण लक्षात घेऊन ही निवडणूक घेण्यात येत असल्याची चर्चा आहे.
हेही वाचा : विदर्भातील राजकीय रणांगण बिनचेह-यांचे !
विधानसभेवर विजयाची ‘डबल हॅट्ट्रिक’ साधून दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांनी इतिहास रचला होता. तळागाळात पक्ष संघटनेची मजबूत बांधणी करून अकोल्यात भाजपचे निर्विवाद वर्चस्व निर्माण करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. सलग सहा निवडणुकांमध्ये विजयश्री खेचून आणणाऱ्या गोवर्धन शर्मा यांना २०१९ मध्ये काँग्रेसने कडवी झुंज दिली. त्यानंतर गेल्या चार वर्षांत त्यांनी जनाधार मजबूत करण्यावर भर दिला. आता त्यांच्या निधनानंतर गड कायम राखण्याचे भाजपपुढे आव्हान राहील. मतदारसंघात सर्वधर्मीय मतदारांची संख्या मोठी आहे. गोवर्धन शर्मा यांच्या तुल्यबळ नेता भाजपला आता मिळणे शक्य नाही. तरी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून भाजप कुणाला संधी देते, यावर बरेच गणित अवलंबून राहतील. पुण्यातील विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा अनुभव लक्षात घेता भाजप नेतृत्व शर्मा कुटुंबात उमेदवारी देणार की इतरांना संधी देणार, हा कळीचा मुद्दा ठरू शकतो. स्व.गोवर्धन शर्मा यांचे पुत्र कृष्णा शर्मा, विजय अग्रवाल, ॲड. मोतीसिंह मोहता, हरीश आलिमचंदानी, डॉ. अशोक आळंबे आदी निवडणूक लढण्यासाठी इच्छूक आहेत. खासदार संजय धोत्रे प्रकृती अस्वस्थामुळे सक्रिय राजकारणापासून दूर असल्याने भाजपने त्यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना लोकसभेच्या मैदानात उतरवले. विधानसभेच्या पोटनिवडणुकीत सुद्धा भाजप तीच रणनीती आखणार का की नवा प्रयोग करून पक्षातील निष्ठावंतांना संधी देणार? यावरून तर्कवितर्क लावले जात आहेत.
हेही वाचा : भंडारा -गोंदियात खुद्द नाना पटोलेच लढणार? कार्यकर्त्यांकडून प्रचार सुरू…
कुणावर विश्वास दाखवणार?
पोटनिवडणुकीत भाजपची उमेदवारी शर्मा परिवारात दिली जाते की इतरांना संधी मिळते, हा महत्त्वपूर्ण मुद्दा आहे. स्व.गोवर्धन शर्मा यांचे पुत्र कृष्णा शर्मा उमेदवारी मिळवण्यासाठी सक्रिय झाले आहेत. दरम्यान, इतर इच्छुकांमध्ये ॲड. मोतीसिंह मोहता गत चार दशकांपासून भाजपमध्ये कार्यरत असून पक्षाशी एकनिष्ठ राहत त्यांनी विविध पदांवर कार्य केले आहे. हिंदुत्ववादी नेता म्हणून त्यांची ओळख आहे. माजी नगराध्यक्ष हरीश अलिमचंदानी यांनी देखील पक्षाकडे अनेक वेळा विधानसभेचे तिकीट मागितले. विजय अग्रवाल यांची देखील दावेदारी आहे. मध्यंतरी त्यांनी पक्षसोडून महापालिकेत वंचितसोबत जवळीक साधली होती. त्यानंतर पुन्हा ते भाजपमध्ये परतले. डॉ. अशोक आळंबे हे गेल्या काही वर्षांपासून तिकिटासाठी प्रयत्नशील आहेत. यापैकी भाजप कुणावर विश्वास दाखवतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
हेही वाचा :
नव्या आमदारांना अल्प कालावधी
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत निवडून येणाऱ्या आमदारांना सुमारे तीन-चार महिन्याचा कालावधी मिळेल. २६ एप्रिलला मतदान होऊन ४ जूनला मतमोजणी होणार आहे. येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात राज्यात विधानसभेच्या निवडणुका लागू शकतात. त्यामुळे नव्या आमदारांचा अल्प कालावधी राहील.