भंडारा : मागील काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांच्या भरपाईसंदर्भात मुख्यमंत्री व सरकारसोबत चर्चा करू, असे आश्वासन राज्यपाल रमेश बैस यांनी भंडारा जिल्ह्यातील अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना दिले. विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहापूर येथील डिफेन्स सर्विसेस अकॅडमी येथे विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम आज ८ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, खासदार सुनील मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, माजी मंत्री परिणय फुके, पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा – भंडारा : आमदार भोंडेकर-परिणय फुकेंमध्ये धुसफूस! आजी आमदाराने माजी आमदाराचे नाव घेणे टाळले

खासदार मेंढे आणि आमदार भोंडेकर यांनी त्यांच्या भाषणादरम्यान जिल्ह्यातील अवकाळीने बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचा मुद्दा उपस्थित करून भरपाईची मागणी केली. त्यावर राज्यपाल यांनी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीबद्दल चिंता व्यक्त करीत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगितले.

हेही वाचा – नक्षलवादी ते तेलंगणा सरकारमध्ये मंत्री; असा आहे सीताक्काचा संघर्षमय प्रवास…

राज्यपाल पुढे म्हणाले की, राज्य आणि केंद्र सरकार जनतेसाठी योजना तयार करते. मात्र त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत त्या उपयोगाच्या ठरत नाही. २०४७ पर्यंत पंतप्रधानांनी विकसित भारताचे स्वप्न पाहिले आहे. ते आपणास पूर्ण करायचे आहे. त्यासाठी कालबद्ध अभियानाचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा, असे आवाहन त्यांनी केले. केंद्र व राज्य सरकार जनतेला सशक्त करण्याचे काम करत आहे, असेही ते म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will discuss with the cm for the compensation of those affected by the calamity governor ramesh bais ksn 82 ssb