चंद्रपूर : पेसा कायद्याअंतर्गत येणाऱ्या गावातील वनरक्षकपदे सोडून इतर पदे तत्काळ भरण्यासाठी राज्याचा वन विभाग राज्य सरकारमार्फत सर्वोच्च न्यायालयाला विनंती करणार आहे. हजारो उमेदवारांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळावा या दृष्टीने वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर मुनगंटीवार यांनी वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर यांच्याशी चर्चा करून भरती प्रक्रियेचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांच्या हितासाठी राज्य सरकार, वन विभाग आणि मी स्वतः संवेदनशील असून त्यांना दिलासा मिळावा, असा आमचा उद्देश आहे. त्यामुळे या विद्यार्थांचे हित प्राधान्यक्रमावर आहे, म्हणूनच हा निर्णय घेत असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात विशेष वकील नियुक्त करण्याची कार्यवाही करा, असे निर्देशही त्यांनी दिले.
हेही वाचा – महामेट्रोची नववर्ष भेट, सोमवारपासून नागपूरकरांना शेयर ऑटो रिक्षाची सोय
हजारो उमेदवारांनी वनरक्षक या पदाची परिक्षा दिली असून केवळ पेसा क्षेत्राच्या अधिसूचनेसंदर्भात संपूर्ण निकाल जाहीर न होऊ शकल्याने अनेक उमेदवार निकालाची वाट बघत आहेत. ही बाब वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी हा विषय गांभिर्याने घेऊन वनविभागाला सूचना केल्या. पेसा क्षेत्र वगळता वनरक्षकाची इतर पदे भरण्यासाठी वन विभाग राज्य सरकारमार्फत सर्वोच्च न्यालयालयाला याबाबत विनंती करणार आहे. यासाठी विशेष वकील नेमण्यात येईल. जेणेकरून इतर क्षेत्रातील वनरक्षकपदासाठी निवड झालेल्या उमेदवारांच्या नोकरीचा मार्ग सुकर होईल.
हेही वाचा – भंडारा : नायलॉन मांजा की धारदार शस्त्र? दुचाकीस्वार तरुणाचा गळा चिरला
वन विभागातील लघुलेखक (उच्चश्रेणी) (गट ब) (अराजपत्रित), लघुलेखक (निम्मश्रेणी) (गट ब) (अराजपत्रित), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट ब) (अराजपत्रित), वरिष्ठ सांख्यिकी सहायक (गट क) कनिष्ठ सांख्यिकी सहायक (गट क) या राज्यस्तरीय संवर्गाची व लेखापाल (गट क), सर्व्हेक्षक (गट क) व वनरक्षक (गट क) या पदांच्या भरतीसाठी ८ जून २०२३ रोजी जाहिरात देण्यात आली होती. वरील जाहिरातीच्या अनुषंगाने संपूर्ण राज्यभरात ५.५ लक्ष अर्ज प्राप्त झाले. वनविभागाची भरती प्रक्रिया ही टी.सी.एस.आय.ओ.एन या कंपनीमार्फत राबविण्यात आली असून त्यांच्याकडून उमेदवारांची ऑनलाईन लेखी परीक्षा ही राज्याच्या विविध १२९ केंद्रावर ३१ जुलै ते ११ ऑगस्ट २०२३ या कालावधीत घेण्यात आली. यापरीक्षेकरीता ८६.४९ टक्के उमेदवार उपस्थित होते.