यवतमाळ : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार अद्यापही जाहीर झालेला नाही. महायुतीच्या उमेदवार रखडपट्टीची खुमासदार चर्चा आता विरोधकांमध्येही रंगली आहे. यवतमाळ-वाशिमच्या जागेबाबात भाजपच्या पुढे जावून निर्णय घेण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धजावत नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख हे आज शिवसेना (उबाठा) युवा नेते आमदार आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज दाखल करण्यापूर्वी स्थानिक पोस्टल मैदानात दोन्ही नेत्यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी दोन्ही युवा नेते यवतमाळात दाखल झाले आहेत. सभेतनंतर शक्तिप्रदर्शन करत संजय देशमुख महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यवतमाळ-वाशीमचा महायुतीचा उमेदवार अद्यापही जाहीर न झाल्याबाबत आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. यवतमाळला येण्यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना, आपण यवतमाळमध्ये सभा घेवून प्रचार सुरू करत असल्याचे सांगितले. हे सर्व होत असताना यवतमाळ-वाशिममध्ये अद्यापही एनडीएचा उमदेवारच ठरलेला नाही. ते भ्रष्ट उमेदवार देणार की, कोण नवीन चेहरा येणार? हा एक प्रश्न आहे, अशी बोचरी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

हेही वाचा – ‘एमपीएससी’च्या मुलाखतीत गुण वाढवून देण्यासाठी ‘निनावी’ फोन, पडद्यामागे कोण…

आदित्य ठाकरे यांनी ही टीका अप्रत्यक्षपणे खासदार भावना गवळींवर केल्याची चर्चा रंगली आहे. भावना गवळी शिवसेना फुटल्यानंतर शिंदे गटात दाखल झाल्या होत्या. त्या महाराष्ट्रातील शिवसेनेच्या एकमेव खासदार आहे. सातत्याने पाचवेळा त्या यवतमाळ-वाशिममधून लोकसभेवर निवडून आल्या आहेत. बदललेल्या राजकीय समीकरणांत गवळींनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेना बळ दिले. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा रोष गवळींनी ओढवून घेतला होता. भावना गवळी या निवडणुकीत उभ्या राहिल्यास त्यांचा पराभव करायचाच, या निश्चयाने उद्धव ठाकरे यांनी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे.

हेही वाचा – “पक्षनिष्‍ठा आमचे भांडवल, कमजोरी नव्‍हे,” भाजपचे नेते तुषार भारतीय यांचा नवनीत राणांविरोधात सूर; म्हणाले…

अवघ्या महिनाभरात त्यांनी चार जनसंवाद सभा मतदारसंघात राळेगाव, पुसद, कारंजा, वाशिम येथे घेतल्या. येत्या २२ एप्रिलला त्यांची प्रचारसभाही यवतमाळ व वाशिम येथे नियोजित असल्याचे सांगण्यात येते. आज यवतमाळात आदित्य ठाकरे निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करणार असून ते भावना गवळी व शिवसेना सोडून गेलेल्या नेत्यांबद्दल काय टिपणी करतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will mahayuti give a corrupt candidate or give a new face aditya thackeray criticism on bhavana gawali candidature nrp 78 ssb
Show comments