वर्धा : अदानी समूहाची ख्याती देशभरच नव्हे तर जगभर आहे. तसेच त्यांचे एखाद्या समूहास स्वतःच्या पंखाखाली घेण्याचे म्हणजेच टेक ओव्हर करण्याच्या कौशल्याची पण सर्वत्र चर्चा होत असते. पण शिक्षण क्षेत्रात मात्र फारसे स्वारस्य या समूहाचे दिसून आले नाही. गडचिरोलीत एक इंग्रजी शाळा त्यांनी ताब्यात घेतल्यानंतर ते या क्षेत्रास पण नजर ठेवून असल्याचे बोलल्या गेले. नंतर अदानी समूह सावंगी येथील दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ ताब्यात घेणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली. गत एक वर्षांपासून या चर्चेने बळ पकडले. त्यातच पूर्ण नव्हे तर काही आर्थिक गुंतवणूक करीत या मेघे वैद्यकीय समूहाचा हिस्सा घेत असल्याची वदंता पसरली. मात्र मेघे समुहाकडून याबाबत कधीही काहीच खुलासा झाला नाही. त्यामुळे चर्चा होतच असते.
आता या चर्चेने परत पेव पकडले आहे. या संदर्भात संस्था विश्वस्त सागर मेघे यांच्याशी बोलणे होवू शकले नाही. मात्र संस्थेच्या सर्व व्यवहारात राहणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ऑफ़ दी रिकॉर्ड नमूद केले की चर्चा आम्ही पण ऐकत असतो. पण टेक ओव्हर हा प्रकार २०० टक्के होणार नाही. हे तेवढेच खरे की अदानी समूहाच्या टेक ओव्हर या विशेष विभागाने विचारणा केली होती. एकदा नव्हे तर दोनदा. पण त्यास स्पष्ट नकार देण्यात आला. ही बाब उपमुख्यमंत्री असतांना देवेंद्र फडणवीस यांना पण कळविण्यात आली होती. आम्ही लावलेला हा वृक्ष आहे, त्याचे आम्हीच जतन करू. अशी भूमिका असल्याचे या वरिष्ठने स्पष्ट केले. अदानी समुहाचे भुज येथे वैद्यकीय महाविद्यालय आहे. तसेच या सत्रात ते मुंबई व अहमदाबाद येथे वैद्यकीय महाविद्यालय सूरू करणार आहे. राज्याच्या एका बड्या नेत्याने त्यांना पीपीपी तत्ववर गडचिरोली येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा सल्ला दिला होता. पण तो तसाच राहल्याची माहिती या अनुषंगाने मिळाली.
सावंगी मेघे येथील मेघे अभिमत विद्यापीठात ५०० टिचिंग व एकूण सात हजार कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ कार्यरत आहे. बारा विविध पदव्या ईथे दिल्या जातात. कोट्यावधी रुपयाची वार्षिक उलाढाल असलेल्या या समूहाने राष्ट्रीय विविध मानांकने प्राप्त केली आहे. शिक्षण व आरोग्यसेवेत नवा मापदंड या संस्थेने प्राप्त केल्याची प्रशस्ती ईथे हजेरी लावलेल्या केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळे या संस्थेवर अदानी समूहाची नजर असण्याची चर्चा वारंवार होत असते. कुलपती दत्ता मेघे हे नेहमी विद्यापीठ समर्थ हातात असल्याचा निर्वाळा देत असतात.