अकोला : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आले आहे. ‘वंचित’चा इंडिया आघाडीमध्ये समावेश होण्याचा मुद्दा रेंगाळला असल्याने अगोदर त्यावर निर्णय घ्या, तरच यात्रेत सहभागी होता येईल. अन्यथा चुकीचा संदेश जाऊ शकतो, अशी भूमिका ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे. निमंत्रणाला उत्तर देणारे पत्र त्यांनी खासदार राहुल गांधींना पाठवले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस नेते खासदार राहुल गांधींच्या नेतृत्वात मणिपूर ते मुंबई अशी सुमारे सहा हजार ७०० किलोमीटरची पदयात्रा सुरू करण्यात आली आहे. भारत जोडो यात्रेचा हा पुढचा टप्पा असून, भारत जोडो न्याय यात्रा असे या पदयात्रेला नाव देण्यात आले. या पदयात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण ॲड. प्रकाश आंबेडकरांना देण्यात आले. या अगोदर वंचित आघाडीने मुंबईत घेतलेल्या संविधान सन्मान सभेचे निमंत्रण खासदार राहुल गांधींना दिले होते. त्या सभेत खासदार राहुल गांधी सहभागी झाले नसले तरी त्यांनी पत्र पाठवून ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेचे कौतुक केले होते. त्यानंतर आता काँग्रेसकडून पदयात्रेचे निमंत्रण ॲड. प्रकाश आंबेडकरांना पाठविण्यात आल्याने दोन्ही पक्षांमधील संवाद वाढल्याचे चित्र आहे.

हेही वाचा – नागपूर : धावत्या गाडीत चिमुकलीशी अश्लील चाळे, कोच अटेंडेंटला प्रवाशांनी चोपले

दरम्यान, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी सशर्त निमंत्रण स्वीकारले आहे. ‘भारत जोडो न्याय यात्रे’त सहभागी होणे कठीण जाईल, यावर भर दिला. वंचित बहुजन आघाडीला अद्याप इंडिया आणि महाविकास आघाडीत आमंत्रित केलेले नाही. त्यामुळे इंडियाचा घटक पक्ष नसताना यात्रेत सहभागी झाल्यास आघाडीची अटकळ बांधली जाईल. ती अद्याप झालेली नाही. वंचित बहुजन आघाडी इंडियात सहभागी झाल्याचा चुकीचा संदेश जनतेच्या मनात पसरवल्या जातील. हे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीसाठीही घातक आहे, असे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रात नमूद केले.

वंचित बहुजन आघाडीला इंडिया आणि महाविकास आघाडीत सहभागी होण्याचे निमंत्रण पाठवावे. तेव्हा यात्रेमध्ये सहभागी होता येईल, असे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – “रामाने शबरीची उष्टी बोरं खाल्ली, आता सत्ताधारी आदिवासींबाबतीत भेदभाव करतात”, जितेंद्र आव्हाड असे का म्हणाले?

वंचितकडून काँग्रेसला चार महिन्यांत तीन पत्र

वंचित बहुजन आघाडीने मागील चार महिन्यांत तीन वेळा काँग्रेसच्या वरिष्ठांना पत्र पाठवले. त्यामध्ये वंचितने इंडिया आघाडीत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. ‘भारत जोडो न्याय यात्रे’साठीचे निमंत्रण देण्यात आले असले तरी महाविकास किंवा इंडिया आघाडीत सहभागी होण्यासाठी अद्याप वंचितला बोलावणे आलेले नाही. ‘वंचित’चा इंडिया आघाडीत समावेश झाल्यास राज्यात महायुतीपुढील आव्हान वाढणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will prakash ambedkar participate in rahul gandhi yatra this condition was placed before the congress ppd 88 ssb