नागपूर : राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप असलेल्या प्रशांत कोरटकर याच्या जामिनावरील सुनावणी कोल्हापूर सत्र न्यायालयात पूर्ण झाली आहे. उद्या मंगळवारी कोरटकरच्या जामिनावर न्यायालय निकाल देणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात कोरटकरविरुद्ध आंदोलने होत असून त्याला अटक करुन कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. राजकीय नेत्यांच्या छत्रछायेत वावरणारा कोरटकर पोलिसांच्या हाती लागत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आज सोमवारी कोल्हापूर न्यायालयात सकाळी सुनावणी सुरु झाली. कोरटकर याच्या वकिलांनी बाजू मांडली. कोरटकर हा पोलिसांना तपासात सहकार्य करीत असून त्याने मोबाईल पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती दिली. सरकारी वकिलांनी कोरटकरला जामीन मिळू नये म्हणून बाजू लावून धरली. कोल्हापूर न्यायालयाने आज दोन्ही बाजू ऐकून घेऊन सुनावणी पूर्ण केली. या प्रकरणावर उद्या निकाल देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे कोरटकला अटक होणार की जामीन मिळणार? याबाबत उलगडा व्हायला आणखी चोवीस तासांचा अवधी आहे.
कोरटकरचा मोबाईल ‘हॅक’ झालाच नाही – पोलीस
कोरटकरने इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना शिवीगाळ केली नसून ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेतली आहे. कुणीतरी मोबाईल ‘हॅक’ करुन माझ्या नावाचा वापर करुन हे कृत्य केल्याचा दावा केला. मात्र, कोल्हापूर पोलिसांनी कोरटकरचा मोबाईल जप्त केला. त्यावेळी कोरटकरच्या मोबाईलमधील सर्व डाटा डिलीट केला होता. पोलिसांनी फॉरेन्सिक विभागात तपासणी केली. त्यात कोरटकरचा मोबाईल ‘हॅक’ झालाच नसल्याचे समोर आले. त्यामुळे आरोपी कोरटकरचा दावा खोटा ठरला.
काय आहे नेमके प्रकरण
कोल्हापुरातील इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी ‘छावा’ चित्रपटावर आपली भूमिका मांडली होती. त्यांनी ब्राह्मण समाजाचा द्वेष केल्याचा आरोप करीत कोरटकर याने फोन करून थेट धमकी दिली. याबाबत सावंत यांनी फोनवरुन झालेला संवाद फेसबुकवर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ‘जिथं असाल तिथे येऊन ब्राह्मणांची ताकद दाखवू, तुम्ही कितीही मराठे एकत्र करा,’ असे म्हणत प्रशांत कोरटकरने सावंतांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि घरात येऊन मारण्याची दिली धमकी दिल्याचा आरोप आहे. तसेच कोरटकर याने राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले, या प्रकरणी कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात प्रशांत कोरटकरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.