वर्धा : विजयाचे अनेक वाटेकरी असतात मात्र पराभवाचे खापर काहींवरच फोडल्या जाते, असे म्हटल्या जाते. आता जिल्हा भाजपमध्ये तसेच घडत असल्याचे चित्र आहे. रामदास तडस यांचा पराभव झाल्यानंतर या पराभवाचे काथ्याकुट होवू लागले आहे. तडस गटाने पराभवाचे खापर प्रामुख्याने जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांच्यावर फोडल्याची जाहीर चर्चा सुरू झाली आहे. गफाट यांच्या क्षेत्रात तडस माघारले. बूथ नियोजन नव्हते. मतदानाच्या दिवशी दुपारनंतर भाजपचे बूथ ओस पडले होते. अनेक ठिकाणी मतदार मत देवू शकले नाहीत. प्रचार नियोजन ढिसाळले होते. असे व अन्य आरोप होत आहे. त्यामुळे आता गफाट यांचे काय, असा प्रश्न चर्चेत आला.
हेही वाचा : राज्यातील ‘या’ भागात आज मुसळधार पावसाचा इशारा; हवामान खात्याचे शास्त्रज्ञ म्हणतात…
या अनुषंगाने प्रथमच गफाट यांनी खुलेपणाने ‘लोकसत्ता ऑनलाईन’सोबट संवाद साधला. पराभवाचे खापर माझ्यावरच फोडल्या जात असेल तर माझा नाईलाज आहे. आदेश आल्यास एका मिनिटात जिल्हाध्यक्षपदाचा मी राजीनामा देणार. मी सामान्य पातळीवरून वाटचाल सुरू केली. माझे कार्य पाहून पक्षाने पद दिल्यानंतर गेल्या अडीच वर्षांपासून मी घरदार वाऱ्यावर सोडून पक्षकार्य करीत आहे. शेती करणे सोडून द्यावे लागले. पण पक्षाचे काम कधीच थांबविले नाही. लोकसभा निवडणुकीत कोणाला तिकीट द्यावे, याबाबत निरीक्षक मंडळी चर्चा करुन गेली. मात्र तिकीट पक्की झाल्यावर एकमताने काम व्हावे म्हणून मी पुढाकार घेतला. अर्ज दाखल करेपर्यंत मंडळ, बूथ, तालुका आढावा सभा घेऊन चुकलो होतो. पायाला भिंगरी लावून फिरलो. तरीही आक्षेप असेल तर मग राजीनामा घ्यावा. कोणी गॉडफादर नसताना मी काम केले. मी माझ्या भावना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना कळविल्यात. आता १४ जूनला मुंबईत जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, सर्व सेलचे अध्यक्ष यांची बैठक आहे. त्यात संधी मिळाल्यास मत मांडणार, अशी भावना गफाट यांनी व्यक्त केली.
हेही वाचा : बाबो! पतीची ऑनलाईन हेरगिरी करण्यात भारतीय महिला तिसऱ्या स्थानी; जाणून घ्या सविस्तर…
तत्कालीन अध्यक्ष डॉ. शिरीष गोडे यांनी राजीनामा दिल्यानंतर काही काळ शिल्लक असल्याने गफाट यांना अध्यक्ष करण्यात आले होते. मात्र संघटना निवडणुकीत परत त्यांनाच अध्यक्षपद सोपविण्यात आले. आता लोकसभा निवडणुकीतील पराभवाने त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जात आहे. मात्र जिल्हाध्यक्ष गफाट यांचे समर्थन करताना एका नेत्याने नमूद केले की, तेच एकटे जबाबदार म्हणता येणार नाही. तडस विरोध असूनही तिकीट आणण्यात यशस्वी झाले. पक्षनिष्ठा व मोदी यांना परत पंतप्रधान करायचे म्हणून जिल्हा संघटना राबली. पण काही मुद्दे विरोधात होतेच. तडस यांचा शेतकऱ्यासोबत झालेल्या संवादाचा ऑडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. सुनेची उमेदवारी चर्चेत राहिली. जातीय कंगोरे होतेच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाल्यानंतर लगतच तळेगाव येथे देवेंद्र फडणवीस यांनी खास बैठक घेत अमरावती व वर्धेचे उमेदवार तसेच आमदारांची मते जाणून घेतली होती. तेव्हा विरोधात जाणारे मुद्दे सांगण्यात आले होते. मग तेव्हा गफाट यांचा मुद्दा एकानेही का मांडला नाही, असा सवाल या नेत्याने केला.