गोंदिया : आरक्षणाला धक्का लागला तर मी १०० टक्के आपल्या खासदारकीच्या पदाचा आणि सर्व राजकीय पदांचा त्याग करणार, त्या परिस्थितीत आम्हाला राजकारणात राहण्याच्या नैतिक अधिकारच राहणार नाही, असे वक्तव्य खासदार प्रफुल पटेल यांनी अर्जुनी मोरगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खासदार प्रफुल पटेल हे सध्या गोंदिया भंडारा जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी आणि पुढील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या पक्षाचे मेळावे घेत आहेत. दरम्यान कार्यकर्त्यांना संबोधित करताना पटेल म्हणाले की, देशांमध्ये आरक्षण हे संविधानात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार आहे त्या आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही, तसेच संविधानाचा मूळ गाभाही कुणी बदलू शकत नाही. आता परत परत विरोधी पक्षाच्या लोकांकडून आणि लोकसभेच्या निवडणुकीतही या संदर्भात एक ‘फेक नेरेटीव्ह’ सेट करून याचा अपप्रचार इतका करण्यात आला की लोक त्यांच्या या भूलथापांना बळी पडले, पण आता लोकांना सत्यस्थिती कळून चुकली आहे. आता लोकांच्या लक्षात आलेले आहे. आणि अजूनही आमच्यासारखे या संविधानाची शपथ घेऊन संसदेत लोकसभा, राज्यसभामध्ये बसलेले आहेत, हे आम्ही कधीही आणि कदापी होऊ देणार नाही याची मी आपल्याला ग्वाही देतो, असे खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले.

हेही वाचा – सावधान! राज्यातील वाघांना बहेलिया शिकाऱ्यांचा धोका, व्याघ्रदिनाच्या पूर्वसंध्येला…

या मेळाव्यानंतर माध्यमांनी बाबाजानी दुर्राणी यांनी जयंत पाटलांची भेट घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) गटात प्रवेश केला यावर विचारले असता खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले की, बघा नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत बाबाजानी दुर्राणी यांना तिकीट नाकारल्यामुळे ते नाराज होते, पण अशा निवडणुकीत पक्षातील अनेक जण इच्छुक असतात, पण तिकीट तर कुणा एकालाच दिली जाते. त्यामुळे सगळ्यांना संतुष्ट करणे पक्षश्रेष्ठींच्या हाती नसते आणि हे सगळ्याच पक्षांमध्ये असते हे काही आजचे नाही, आपल्या राज्यात बघितले तर आजघडीला दोन्हीकडे तीन तीन पक्षांची युती आहे, त्यामुळे पुढील दोन महिन्यांत बघा विधानसभा निवडणुकीतपण तिकीट वाटपावेळी हे सगळं काही इकडचं तिकडं आणि तिकडचं इकडं होणारच आहे. मी गेल्या दोन दिवसांपासून गोंदिया भंडारा जिल्ह्यात आहे, त्यामुळे बाबाजानी दुर्राणी यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) गटात प्रवेशाबद्दल जास्त काही माहिती नाही, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.

हेही वाचा – वर्धा : थरारक! वाघाडी नदीला पूर, तरीही पुलावरून ट्रक नेला; नंतर जे घडले ते…

शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ५९ याचिका क्लोजर रिपोर्टवर दाखल करण्यात आले आहेत. या प्रश्नावर उत्तर देताना खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले की, हे सगळं सध्या न्यायप्रविष्ठ बाबी आहेत, याच्यावर मला आता भाष्य करायचं नाही, आणि घोटाळा हे शब्द म्हणजे या करिता अतार्किक आहे. कोणतेही प्रकरण याला एक घोटाळा म्हणून आपण सुरू करतो ही चुकीची बाब आहे. त्या प्रकरणात कोणी दोषी आढळून आला तर त्याला घोटाळा म्हणता येईल, पण प्रत्येक प्रकरण किंवा काही कामात असलेली अनियमितता समोर आली की याला सरळ घोटाळा म्हणणे ही प्रथा आता बंद केली पाहिजे, असेही खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले.