अमरावती : सूर्यमालिकेतील महत्त्वाचा ग्रह म्हणजे शनी. शनी ग्रहाभोवती विलोभनीय अशा कडा आहेत; ज्यामुळे या ग्रहाचे वेगळेपण दिसून येते. परंतु, या कडा मार्च महिन्यापासून अदृश्य होतील, अशी माहिती खगोलतज्ज्ञांनी दिली आहे.
प्रसिद्ध शनीच्या कडा नऊ महिने म्हणजेच मार्च ते नोव्हेंबरपर्यंत पृथ्वीवरून दिसणार नाहीत. नोव्हेंबर २०२५ नंतर शनीच्या या कडा पृथ्वीवरून पाहता येतील. या आधी २००९ मध्ये अशी घटना घडली होती. सरासरी १५ वर्षानंतर ही स्थिती उद्भवते. त्यामुळे खगोलप्रेमींचा हिरमोड होईल, अशी माहिती हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी दिली.
शनी व पृथ्वी यांच्या सापेक्ष स्थितीवर कडांचे दृश्य अवलंबून असते. ज्यावेळी पृथ्वी शनीच्या विषुववृत्त पातळीत येते त्यावेळी पृथ्वीवरून शनीच्या कडा दिसत नाहीत. अशा वेळी शनीला एक अंधूक रेषा छेदत आहे असा आपल्याला भास होतो. शनी २.५ अंशातून तर पृथ्वीचा अक्ष २३.५ अंशातून कललेला आहे. त्यामुळे एक वेळ अशी येते की, पृथ्वी सापेक्ष शनीचा अक्ष सुमारे २६ अंशातून कलतो. अशा वेळी कडांचे सुंदर दर्शन घडते. शनी हा पृथ्वीच्या प्रतलात येत असल्याने पृथ्वीवरून शनीच्या कडा दिसू शकत नाहीत.
शनीला एकूण ८२ चंद्र असून, सर्वात मोठा चंद्र टायटन हा आहे. या ग्रहाला सूर्याभोवती एक चक्कर मारण्यास २९.५ वर्षे लागतात. या ग्रहाचा व्यास १,२०,००० किमी. आहे. तापमान शून्याखाली १८० अंश सेंटिग्रेड आहे. या ग्रहाची घनता सर्वात कमी आहे. शनीची कडा २ लाख ७० हजार किमी. पर्यंत पसरलेली आहे. या कडा बर्फाच्या आहेत. शनीचे वस्तूमान पृथ्वीच्या ९५ पट आहे. पृथ्वी ज्या वेळी शनीच्या विषुववृत्त पातळीत असते. अशा वेळी शनीच्या कडा पृथ्वीवरून चांगल्या प्रकारे दिसू शकत नाहीत. २१ सप्टेंबर २०२५ रोजी शनी हा पृथ्वीच्या जवळ येईल. परंतु, कडा हरवून बसलेला दुबळा शनी कसा दिसेल, याची कल्पनाच न केलेली बरी, अशी माहिती मराठी विज्ञान परिषद, अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने, हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी दिली आहे.
शनी ग्रहाच्या विलोभनीय कडा
शनीचे कडे म्हणजे बर्फ, खडकाचे तुकडे आणि अंतराळातील धुळीपासून बनले आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर हे घटक शनी ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्याभोवती गोल फिरतात. मात्र त्या कडा असल्याचा आपल्याला भास होतो. शनी ग्रहाच्या कडा या दुर्बिणीने पाहिल्यास अत्यंत मोहक दिसतात.