अमरावती : शिवसेना ठाकरे गटाच्‍या उपनेत्या सुषमा अंधारे यांना अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येणार असल्‍याची चर्चा रंगली असून, ठाकरे गटाच्‍या हालचालींकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले आहे. सुषमा अंधारे यांना उमेदवारी मिळाल्‍यास भाजपाच्या सहयोगी खासदार नवनीत राणा आणि सुषमा अंधारे यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीत शिंदे गट आणि भाजपाला जोरदार टक्कर देण्याची तयारी शिवसेना ठाकरे गटाने केल्याचे दिसून येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात ठाकरे गटाची नुकतीच बैठक घेण्यात आली. यात विधानसभा – लोकसभा निवडणुकीवर चर्चा झाल्‍याचे सांगण्‍यात आले. गेली अनेक वर्षे अमरावती मतदारसंघावर शिवसेनेची पकड होती. त्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संपूर्ण लक्ष असल्याचे दिसून येत आहे. या बैठकीत ठाकरे गटाचे अमरावती जिल्हाप्रमुख आणि जिल्हा संपर्कप्रमुखांवर मोठी जबाबदारी देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. अमरावती मतदारसंघातून सुषमा अंधारे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.

हेही वाचा – दक्षिण गडचिरोलीवर पुन्हा एकदा ‘खाण संकट’!

अमरावती लोकसभा मतदारसंघात १९९९ पासून ते २०१९ पर्यंत वीस वर्षे शिवसेनेचे खासदार निवडून आले आहेत. यात अनंतराव गुढे, आनंदराव अडसूळ, यांनी प्रत्येकी दोनदा निवडणुकीत विजयी होत शिवसेनेचे वर्चस्‍व कायम राखले होती. मात्र, २०१९ मध्ये राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर नवनीत राणा या खासदार म्हणून अपक्ष निवडून आल्या. त्यानंतर त्यांनी भाजपाला सहकार्य करण्याचे ठरविले. यामुळे आता ठाकरे गट आक्रमकपणे या मतदारंसघात निवडणूक लढणार असल्याचे दिसून येत आहे. आनंदराव अडसूळ हे शिंदे गटात सहभागी झाल्‍याने अमरावतीत शिवसेना ठाकरे गट नवीन उमेदवाराच्‍या शोधात आहे.

हेही वाचा – नागपूर: मालगाडीचे दोन वॅगन रुळावरून घसरले; कॉर्ड लाईनवर अपघात झाल्याने…

दोन महिन्‍यांपूर्वी सुषमा अंधारे यांची आमदार रवी राणांच्‍या मतदारसंघात शिवगर्जना अभियानात जाहीर सभा झाली. यावेळी सुषमा अंधारे यांनी खासदार नवनीत राणांवर टीकास्त्र सोडले होते. एकीकडे अनेक गरीब मुलींचे जात पडताळणी प्रमाणपत्र प्रलंबित असताना त्‍यांना नोकरीत संधी नाकारली जाते आणि त्‍याचवेळी अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्‍या अमरावती मतदारसंघात नवनीत राणा या खोट्या जात प्रमाणपत्राच्‍या आधारे निवडणूक लढवून आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करीत आहेत. या प्रकरणावर खासदार नवनीत राणा का बोलत नाहीत? या प्रकरणाचा धडाक्‍याने निकाल का लागत नाही? असा सवालही सुषमा अंधारे यांनी केला होता.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will sushma andhare contest the lok sabha elections against navneet rana mma 73 ssb