लोकसत्ता टीम

चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी ओबीसी नाहीत, असे खोटे व असत्य आरोप करणारे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी दिली.

राहुल गांधी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलचे विधान असत्य आहे. ते खोटे बोलत आहेत. त्यांनी केलेले आरोप गांभीर्याने घेतले आहेत. पंतप्रधान मोदी ओबीसी नाहीत, असे म्हणणे संपूर्ण ओबीसींचा अपमान आहे. त्यांच्या आरोपानंतर संपूर्ण कागदपत्रे तपासून पाहिली असता गांधी खोटे बोलत असल्याचे स्पष्ट झाले. यासाठी पंतप्रधान ओबीसी असल्याचे पुरावे देणार असल्याचे अहीर यांनी सांगितले. आता एखादी संस्था अथवा अन्य कुणी ओबीसी प्रवर्गाचा अपमान केला, पंतप्रधान मोदी यांचा अपमान केला, अशी तक्रार आली तर कारवाई करू, असे हंसराज अहीर यांनी स्पष्ट केले.

आणखी वाचा-लोकसभा निवडणुकीसाठी भाजप दक्ष, विदर्भातील पाच मतदारसंघांवर अमित शाहांचे लक्ष! तयारीला वेग

उल्लेखनीय आहे की, राहुल गांधी यांनी यापूर्वीदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वाद उद्भवला आहे. मोदी आडनावावरून राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर गुजरात न्यायालयाने त्यांची खासदारकी रद्द केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना खासदारकी पुन्हा बहाल केली. आता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी जन्माने ओबीसी नाहीत, असे वक्तव्य करून राहुल गांधी अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर या प्रकरणाचा किती पाठपुरावा करतात, हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सध्या अहीर तक्रारीच्या प्रतिक्षेत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हंसराज अहीर देशाचे गृहराज्यमंत्री राहिलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कट्टर समर्थक म्हणून ते जिल्ह्यात आणि राज्यात ओळखले जातात. आगामी लोकसभा निवडणुकीत अहीर यांनी चंद्रपूर – वणी – अर्णी लोकसभा मतदार संघातून उमेदवारी मागितली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अहीर ४४ हजार मतांनी पराभूत झाले होते. त्यावेळी काँग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर यांनी त्यांचा पराभव केला होता. हा पराभव अहीर यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. पुन्हा उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी राहुल गांधी यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करणार, असे जाहीर केले असावे, अशी चर्चा चर्चा जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.