अकोला : शिक्षक महासंघ व विज्युक्टाने पुकारलेल्या आंदोलनाचे गंभीर परिणाम बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर होत आहे. शिक्षकांच्या बहिष्कार आंदोलनामुळे राज्यातील बारावीच्या परीक्षेतील सुमारे ५२ लाख उत्तरपत्रिकांचे मूल्यांकनाचे काम रखडल्याचा दावा आंदोलक संघटनांनी केला आहे.
या आंदोलनामुळे पुणे येथील मुख्य नियमकांच्या सर्व बैठकी रद्द झाल्यानंतर आज अमरावती विभागीय शिक्षण मंडळातील मराठी विषयाच्या नियमकाची बैठक सुद्धा झाली नाही. अमरावती विभागात बारावीला एक लाख ५२ हजार विद्यार्थी प्रविष्ठ असून, सहा लाखांपेक्षा अधिक उत्तपत्रिका तपासणीशिवाय पडून आहेत. या आंदोलनाचा परिणाम निकालावर पडण्याची दाट शक्यता आहे.
शिक्षकांचे विविध प्रश्न गत अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. वारंवार शासनाला निवेदन देऊनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे राज्यातील शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. मागण्यांच्या पूर्ततेसाठी ५ सप्टेंबरपासून तालुका व जिल्हा स्तरावर विविध आंदोलने करण्यात आली. मागण्यांकडे सातत्याने डोळेझाक केल्यामुळे शिक्षकांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. बारावी परीक्षांच्या उत्तरपत्रिका मूल्यांकनावर विज्युक्टा व महासंघाच्या आवाहनानुसार शिक्षकांनी बहिष्कार टाकला आहे. आंदोलन तीव्र करण्याची संघटनेची भूमिका असल्याचे विज्युक्टाचे अध्यक्ष डॉ. अविनाश बोर्डे यांनी सांगितले.
हेही वाचा – अमोल कोल्हेंनी नागपूरात वाजवलेली “शिट्टी”; चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची ठरु शकते डोकेदुखी
हेही वाचा – होय, आम्ही समलिंगी आहोत! चंद्रपूर शहरात भव्य मिरवणूक
१ नोव्हेंबर २००५ पूर्वी विना, तसेच अंशतः अनुदानावरील नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह अनेक मागण्यांसाठी शिक्षकांनी बारावीच्या उत्तरपत्रिका मूल्यांकनावर बहिष्कार टाकला आहे. शिक्षण मंडळावर आज झालेल्या नियामकांच्या बहिष्कार सभेमध्ये डॉ. अविनाश बोर्डे, प्रा. शिवराम बावस्कर, प्रा.डी एस राठोड, प्रा. ईकबाल खान, प्रा. संजय गोळे, प्रा. सुभाष पारीसे, प्रा. श्रीराम पालकर, प्रा. मंगेश कांडलक, प्रा. तेलंग, प्रा. पवण ढवळे आदीसह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.