वाशीम : पंतप्रधान किसान योजनेची सन २०१९-२० पासून अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्याचे ई-केवायसी प्रमाणीकरण, बँक खाते आधार संलग्न करणे व भूमी अभिलेख नोंदी अद्यावत करणे या बाबी केंद्र शासनाने अनिवार्य केल्या आहेत. शासनाच्या सूचनेनुसार जे लाभार्थी ई- केवायसी पूर्ण करणार नाही किंवा बँक खाती आधार संलग्न करणार नाहीत, अशा शेतकऱ्यांची नावे योजनेतून वगळण्यात येणार आहेत.
ई- केवायसी करण्याकरीता मे, जुलै व ऑगस्ट महिन्यात कृषी विभागाच्या वतीने मोहीम राबवण्यात आली होती. परंतु अद्यापही जिल्ह्यातील १४ हजार ८२९ लाभार्थ्यांची ई – केवायसी प्रलंबित आहे. तसेच ११ हजार ११७ लाभार्थ्यांची आधार सिडींग प्रलंबित आहे. ई- केवायसी व आधार सिडींग न करणाऱ्या शेतकऱ्यांची नावे वगळण्यासाठी शासनस्तरावरून सूचना प्राप्त झाल्याने लाभार्थ्यांनी ६ सप्टेंबर २०२३ पर्यंत ई-केवायसी व बँक खाते आधार संलग्नीसकरण करावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास ७ सप्टेंबर २०२३ पासून अशा शेतकऱ्यांची नावे रद्द करण्यायची कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आरीफ शाह यांनी दिली.