महेश बोकडे
नागपूर : लक्षावधी रुग्णांना वैद्यकीय सेवा देणाऱ्या सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण खात्याच्या विविध रुग्णालयांत समन्वय नाही. गडचिरोलीतील नक्षलग्रस्त हिदूर गावात वैद्यकीय सेवा देताना हा प्रकार महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर यांच्या निदर्शनास आला. त्यामुळे रुग्णांची हेळसांड थांबवण्यासाठी आता विद्यापीठाच्या माध्यमातून त्या वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागात समन्वयाचा प्रयत्न करणार आहे.
२३ जानेवारी २०२३ रोजी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने शासनाच्या इतर विभागांच्या मदतीने गडचिरोलीतील हिदूर या नक्षलग्रस्त गावात आदिवासींमधील आजारांवर अभ्यासासाठी ‘ब्लाॅसम’ प्रकल्पास प्रारंभ केला. यावेळी कुलगुरू कानिटकर यांनी रुग्ण व त्यांचे नातेवाईकांसह विविध अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संवाद साधल्यावर त्यांना सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारित असलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सकांसह वैद्यकीय शिक्षण खात्याच्या रुग्णालयांत रुग्ण इतरत्र पाठवताना समन्वय नसल्याचे निदर्शनात आले.
त्यामुळे बरेच रुग्ण उपचाराला मुकतात. त्यांनी लगेच आरोग्य विद्यापीठाकडून रुग्णांच्या उपचारात हयगय होऊ नये म्हणून वैद्यकीय शिक्षण खात्याचे सचिव, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव आणि आरोग्य विद्यापीठाच्या समन्वयातून यंत्रणा उभारण्याची चाचपणी सुरू केली. त्यासाठी लवकरच त्या दोन्ही विभागांच्या सचिवांशी संवाद साधणार आहे. या उपक्रमानंतर एखादा रुग्ण इतरत्र पाठवताना लगेच आधी संबंधिताला सूचना देऊन तेथे रुग्णांच्या सोयीची खात्री होईल.
“शासकीय रुग्णालयात रुग्णांना वेळीच उपचार मिळावा. यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ पुढाकार घेऊन सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण खात्याच्या सचिवांशी चर्चा करून समन्वय करून व्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न करेल.”