नागपूर : राज्यातील बऱ्याच भागात पावसाचा जोर कायम असल्याने डासांची संख्या वाढत आहे. मागील दोन वर्षातील १ जानेवारी ते २१ जुलै या कालावधीची तुलना केल्यास राज्यात यंदा हिवतापाचे रुग्ण ३३ टक्क्यांनी वाढले असून मृत्यूंमध्ये तिप्पट वाढ झाल्याचे समोर येत आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, २०२३ मध्ये राज्यात १ जानेवारी ते २१ जुलै अशा साडेसहा महिन्यांच्या काळात ५ हजार ५९२ रुग्ण आढळले. त्यापैकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला. २०२४ मध्ये सारख्याच कालावधीत तब्बल ७ हजार ४४७ रुग्ण आढळले. उपचारादरम्यान ६ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूसंख्याही तिपटीने वाढली. यंदा सर्वाधिक ३ हजार ४७९ रुग्ण गडचिरोली जिल्ह्यातील आहेत. बृहन्मुंबईत २ हजार ६०३, चंद्रपूर ३२१, पनवेलमध्ये १८८ रुग्ण आढळले.
हेही वाचा…वर्धा : सर्पमित्रांचा नवाच फंडा, घरात साप सोडायचा अन् पुरस्कार लाटायचा…
ही रुग्णसंख्या येत्या काळात आणखी वाढण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रात वर्तवली जात आहे. आरोग्य विभागाकडून प्रभावी उपाय केले जात असल्याने आजार नियंत्रणात आहे, असा दावा सार्वजनिक आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याने केला.
हिवतापाच्या रुग्णांची स्थिती
१ जानेवारी ते २१ जुलै
वर्ष रुग्ण मृत्यू
२०२३ ५,५९२ ०२
२०२४ ७,४४७ ०६
एकूण १३,०३९ ०८
हिवताप म्हणजे काय?
हिवताप अथवा मलेरिया हा परजीवीमुळे होणारा आजार आहे. हा परजीवी संक्रमित डासांच्या चाव्याव्दारे मानवांमध्ये पसरतो. ज्या लोकांना हिवताप आहे त्यांना सहसा खूप ताप येतो आणि थंडी वाजते.
हेही वाचा…शासकीय कामांना लाचेची कीड; पश्चिम विदर्भात लाचखोरीची ‘पन्नाशी’; पैसे दिल्याशिवाय…
लक्षण..
-थंडी वाजण्याचा त्रास सुमारे १५ मिनिटे ते तासभर चालतो.
-थंडी वाजून ताप येतो.
-ताप कमी होताना घाम येऊन उतरतो.
-ताप सहसा दुपारनंतर येतो.
-तापाबरोबर खूप डोकेदुखी,- अंगदुखी, कंबरदुखी, थकवा, इत्यादी लक्षणे जाणवतात.
-हिवताप सौम्य असेल तर लक्षणे सौम्य असतात.
हेही वाचा…पीएसआय परीक्षेत ‘महाज्योती’चा अमोल घुटूकडे राज्यात प्रथम
प्रतिबंधात्मक उपाय…
-संध्याकाळी दारे खिडक्या उघड्या ठेऊ नका
-डास- प्रतिबंधक मलम/ गुडनाईट/ धूप/ उदबत्ती लावल्याशिवाय झोपू नये
-गडद रंगाचे व तोकडे कपडे वापरु नये
-मच्छरदाणीशिवाय झोपू नये
-घरात व घराभोवती पाणी साठू देऊ नये
-घरात व घराभोवती भंगार साहित्य ठेऊ नये
-आठवड्यापेक्षा जास्त दिवस पाणी साठवून ठेऊ नये व पाणी साठे उघडे ठेऊ नये.