नागपूर: शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्र्यांचा पत्ता नाही. तरीही विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरमधील राज्यमंत्र्यांच्या बंगल्यांच्या सजावटीवर कोटय़वधी रुपयांची उधळपट्टी करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी या वारेमाप उधळपट्टीवरून विधानसभेत सरकारला धारेवर धरले. त्यावर कधीही मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, म्हणून ही तयारी करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगत वेळ मारून नेली.
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सध्या एकही राज्यमंत्री नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अधिवेशन काळासाठी आपल्याकडील काही विभागांची सभागृहातील कामकाजाची जबाबदारी सहकारी मंत्र्यांवर सोपविली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने नागपूरमधील राज्यमंत्र्यांच्या बंगल्याची रंगरंगोटी आणि सजावट केली असून त्यावर कोटय़वधी रुपये खर्च करण्यात आला आहे. यावरून सुनील प्रभू यांनी सरकारचे लक्ष वेधत जोरदार टीकास्त्र सोडले. न्यायालयीन निर्णयाच्या अधीन असलेल्या या सरकारमध्ये एकही राज्यमंत्री नसताना नागभवनमधील राज्यमंत्र्यांचे सर्व बंगले सुसज्ज केले आहेत. यावर कोटय़वधी रुपयांचा निधी खर्च केला आहे. एका बाजूला विविध प्रकल्पांसाठी शासन लाखो, कोटी रुपयांचे कर्ज काढत असताना दुस-या बाजूला अशा पद्धतीने जनतेच्या पैशांचा चुराडा राज्यमंत्र्यांच्या बंगल्यावर केला जात असल्याचा आरोप प्रभू यांनी केला. त्यावर अधिवेशन काळात कधीही मंत्रिमंडळ विस्तार करू शकतो, असे फडणवीस यांनी सांगितले. आम्ही मंत्रिमंडळ विस्तार कधी करणार ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांना माहिती नसते. त्यामुळे बंगले तयार ठेवले आहेत, असा दावा फडणवीस यांनी केला.
उद्धव ठाकरे यांचे जोरदार स्वागत
नागपूर : शिवसेना पक्षप्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांचे सोमवारी दुपारी नागपुरात आगमन झाले. त्यावेळी शिवसैनिकांनी त्यांचे विमानतळावर जंगी स्वागत केले. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रथमच ठाकरे नागपुरात दाखल झाले. त्यांच्याबरोबर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, सचिव मिलिंद नार्वेकर होते. मंगळवारी दुपारी होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत. ठाकरे यांच्या स्वागतासाठी विमानतळावर मोठय़ा संख्येने शिवसैनिकांनी गर्दी केली होती. ठाकरे यांनी रात्री पक्षाच्या आमदारांची बैठक घेतली.
सीमावर्ती गावांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम- उपमुख्यमंत्री
नागपूर : राज्याच्या सीमावर्ती भागातील गावांसाठी सद्यस्थितीत वेगळय़ा योजना नाहीत, त्यामुळे त्या भागातील नागरिकांच्या मनात अन्यायाची भावना आहे. यातून दुसऱ्या राज्यात जाण्याची भाषा अलीकडच्या काळात काही जण करू लागले आहेत, त्यामुळे या गावांच्या विकासासाठी वेगळा कार्यक्रम हाती घेतला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.
विधान परिषदेचे कामकाज सुरू झाल्यावर विरोधकांनी सीमावादाचा मुद्दा उपस्थित केला. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या महाराष्ट्र व कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत नेमके काय ठरले, त्यानंतरही महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या नेत्यांवर तेथील सरकारने बंदी का घातली यावर सरकारने निवेदन करावे, अशी मागणी केली. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, सरकार सीमावासीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. अनेक वर्षांनंतर प्रथमच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांशी बोलून चर्चा केली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे मांडली.
ती भारत-पाक सीमा आहे का? – दानवे
केंद्रीय गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापर्यंत जैसे-थे स्थिती ठेवावी व दोन्ही राज्यात जाणे-येणे करण्यास बंदी नसावी, असे ठरले असताना महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना बेळगावात जाण्यास बंदी का? महाराष्ट्र-कर्नाटक सीमा ही भारत-पाक सीमा आहे का? आपण पाकिस्तानी आहोत का, असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सरकारला केला. विधिमंडळ व सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी दानवे यांनी केली. यावेळी जयंत पाटील (शेकाप), अभिजित वंजारी (काँग्रेस) यांची भाषणे झाली.
‘शाई पेन’चा धसका
चंद्रकांत पाटील यांच्यावर नुकत्याच घडलेल्या शाईफेक प्रकरणानंतर विधान भवन परिसरातील सुरक्षा यंत्रणेकडून शाई पेनचा धसका घेण्यात आला आहे. या परिसरात शाई पेनावर प्रतिबंध घालण्यात आला असून पहिल्या दिवशी विधिमंळात येणाऱ्या सर्व व्यक्तींचे पेन तपासण्यात आले. शाईचे पेन परिसरात नेण्यास बंदी घालण्यात आली.