नागपूर : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांबाबत मोठे बॉम्ब फोडण्याचा सूचक इशारा शिंदे-फडणवीस सरकारला दिला होता. यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यावर विधान भवन परिसरात आमच्याकडे बरेच बॉम्ब आहेत. त्यांच्या वाती काढल्या आहेत, फक्त त्या पेटवण्याचा अवकाश असल्याचा इशारा दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 मला वाटते आधी तात्काळ सीमाभागातील काही लाख मराठी माणसांचे आयुष्य उद्ध्वस्त होणे थांबवण्यासाठी ठराव केला पाहिजे. या भागातील मराठी माणसांनी निवडणुका जिंकून दाखवल्या आहेत. मी तुम्हाला एक पेन ड्राइव्ह देणार आहे, कारण विरोधी पक्षात आले की पेन ड्राइव्ह यायला लागतात, अशी एक पद्धत झाली आहे. या पेन ड्राइव्हमध्ये ७०च्या दशकात महाराष्ट्र सरकारनेच केलेली ‘केस फॉर जस्टीस’ ही फिल्म दिली आहे. ती फिल्म मी मुद्दामहून आणली आहे. त्या फिल्मचा उद्देश स्पष्ट आहे. साधारणत: १८व्या शतकापासून तिकडे मराठी भाषा कशी वापरली जाते हे दाखवले आहे. त्यात जुन्या मराठी पाटय़ा, प्रशासकीय कामकाजाची मराठीतील कागदपत्रे आहेत. शाळा मराठी होत्या, महिला मंडळ आणि इतर संस्थाही मराठी होत्या हेही त्यात दाखवले आहे. हे सगळे पुरावे त्यात आहेत.

हिवाळी अधिवेशन : एकनाथ शिंदे यांच्यावर टीका

कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नासारखा महत्त्वाचा विषय चर्चेला असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीवारी करतात. खरे तर महत्त्वाचा विषय सोडून त्यांना दिल्लीत जाण्याची गरज नव्हती, पण ते गेले. तेथे जाऊन ते या विषयावर बोलणार आहेत का, तर तेही नाही. आता ते परत कधी येतील माहिती नाही. समजा यायला निघाले आणि परत दिल्लीला बोलावले तर त्यांचे विमान हवेतूनच दिल्लीकडे वळेल, असा टोला राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला.  ‘आम्हीसुद्धा लाठय़ा खाल्ल्या’, असे विधानसभेत सांगितल्याचे कानावर आले. ‘पण तुम्ही काय सांगताय. तुम्ही लाठय़ा खाल्ल्या तेव्हा तुम्ही आमच्या पक्षात होता. आता तुम्ही सीमापार गेले आहात. म्हणून आता तुम्ही गप्प बसावे असा त्याचा अर्थ होत नाही. त्यांचे मुख्यमंत्री जोरात बोलतात. आमचे मुख्यमंत्री जोरात बोलत नाहीत. कर्नाटकएवढी धमक तुमच्यात आहे का, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

सरकारकडून नैतिकतेची अपेक्षा कशी करणार?

 राज्यात नुकतेच सरकार अस्तित्वात आल्यावर भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी हे म्हणाले की, राज्यातील हे सरकार अनैतिक आहे. त्यामुळे आपण या अनैतिक सरकारकडून नैतिकतेची काय अपेक्षा धरणार, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Winter session convention rulers warning shinde fadnavis government uddhav thackeray warning ysh